Bookstruck

दुःखी करुणा 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

धान्य आता मुळीच मिळेनासे झाले. करुणा कोठून तरी, काही तरी आणी व सासूसा-यांस दोन तुकडे देई. ती कोठून कोंडा आणी, कण्या आणी. रानातून कधी ओला पाला आणी. काही तरी करी व सासूसा-यांना जगवी.

‘करुणे, कसली ही भाकरी ! घाणेरडा कोंडा, हा का खायला घालणार आम्हाला ? तू मागून जेवतेस. तुझ्यासाठी चांगली करीत असशील भाकरी, म्हणून तर दुणदुणीत आहेस. बाळ शिरीष, कोठे रे आहेस तू ? परंतु ही कैदाशीण घरात आहे, तोपर्यंत तू घरात येणार नाही. अस, बाळ कोठेही सुखात अस ! असे सासू बोलत होती.’

करुणेचे डोळे घळघळू लागले. खरोखर दोन दिवसांत तिला घास मिळत नसे. जे काही मिळे, ते आधी सासूसास-यांस देई. तरी ही अशी बोलणी. तिची सत्त्वपरिक्षा चालली होती.

एके दिवशी सरकारी दुकानावर करुणा गेली होती. तिथे अपार गर्दी. केव्हा येणार तिची पाळी ? आणि ही काय ग़डबड? अरेरे ! ती पाहा एक गरिब स्त्री !
तिचे दिवस भरले वाटते ! अरेरे ! गर्दीत धक्काबुकी होऊन ती तेथेच बसली आणि प्रसुत झाली ! दुष्काळात बाळ जन्माला कशाला आले ?

करुणेने त्या भगिनीची व्यवस्था केली. तिला सावरले. तिला एका झोपडीत तिने पोचविले. ती परत आली. रात्र होत आली. दुकान बंद होत होते.

‘मला द्या हो दाणे. मी त्या बहिणीला पोचवायला गेल्ये होते. द्या हो दादा.’

‘आता उद्या ये. आम्ही थकलो.’

‘सासूसासरे उपाशी आहेत. द्या मी एकटीच आहे. येथे आता गर्दी नाही. राजा यशोधराच्या राज्यात का दया उरलीच नाही ?’

‘य़शोधर गादीवर आहेत. म्हणून तर इतकी व्यवस्था. सर्वत्र दुष्काळ. ते तरी काय करतील? प्रधान शिरीष ह्यांनी दुस-या देशांतून धान्य आणण्यासाठी हजारो बैलगाड्या पाठवल्या आहेत. स्वतः यशोधर महाराज एकदा चार घास खातात. प्रजा पोटभर जेवेल त्या दिवशी मी पोटभर जेवेन असे त्यांनी राजधानीत जाहीर केले. राजधानीतील मोठमोठ्या अधिका-यांच्याही घरी दोनचार दिवसांना पुरेल इतकेच धान्य असते. महाराजांचे थोर उदाहरण सर्वांसमोर आहे. तरी त्यांना तू नावे ठेवतेस ? पातकी आहेस !’
तो अधिकारी म्हणाला.

« PreviousChapter ListNext »