Bookstruck

सचिंत शिरीष 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘शिरीष, तुला एक गोष्ट सांगू? ऐक. मधून मधून स्वप्नात मला बाळ दिसते. मी धावत त्याला उचलायला जाते इतक्यात एक सुंदर स्त्री तेथे येते व ती त्या बाळाला हात लावू देत नाही. ती स्वतःही ते उचलत नाही व मलाही उचलू देत नही. ते बाळ मग अदृश्य होते. कितीदा तरी असे स्वप्न पडते. काय रे ह्याचा अर्थ? मी एका भविष्यवेत्त्यास विचारले. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला मूल होईल. शिरीष, आम्ही बायका हो. आम्हास आई होण्याहून अधिक आनंदाचे काय?’

‘म्हणून तू माझे दुसरे लग्न लावीत होतीस वाटते? सवत आल्यावर मूल होईल ह्या आशेने माझे दुसरे लग्न. होय ना हेमा? इतकी तू शिकलेली, तरी या भविष्यवेत्त्या कुडबुड्यांच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवतेस?’

‘शिरीष, कधी कधी गोष्टी होतातही ख-या. ह्या दृश्य जगाहून खरे जग अनंत आहे. अनंत शक्ती, अनंत जीव ह्या विश्वब्रह्मांडात स्थुल नि सूक्ष्म रुपाने हिंडत आहेत. सर्वांचा एकमेकांवर परिणाम होत आहे.’

‘आता मात्र पांडित्य दाखवू लागलीस खरी. मला व्यवहारी माणसाला हे तुझे गहन गूढ काही समजत नाही.’

‘शिरीष, जाऊ देत ही बोलणी. तू आनंदी राहा, हस, म्हणजे मी सुखी होईन, दुसरे काय सांगू?’

असे दिवस जात होते. हेमा आपल्याकडून शिरीषला आनंद व्हावा म्हणून सारखी झटे. तिने एक सुंदर पक्षी पाळला. सोनेरी पिंज-यात तो असे. त्याला ताजी रसाळ फळे ती घाली. त्या पाखराला तिने बोलायला शिकविले. काय शिकविले?

‘हसा हसा. रडू नका, रुसू नका, हसा; हसा. शिरीष, हस. हेमा, हस. सारी हसा. आनंदी राहा. देवाच्या राज्यात सुखी राहा.’

शिरीष आला म्हणजे हेमा त्या पाखराला म्हणे, ‘पाखरा, पाखरा, बोल, बोल.’ की तो पाखरु बोलू लागे आणि शिरीषला खरेच हसू येई, हेमाही हसे.

‘हेमा, तू सांगून कंटाळलीस म्हणून वाटते पाखराकडून मला सांगवतेस?’

‘परंतु पाखराचे तू ऐकतोस. हसतोस. मी किती सांगितले तरी तू हसत नाहीस.’

‘हेमा, पाखरु मला हसवते परंतु ते रडत असेल.’

« PreviousChapter ListNext »