Bookstruck

समारोप 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘शिरीष, सासूबाई व मामंजी ह्यांच्या समाध्यांना फुले वहायला केव्हा जायचे ?’ हेमाने
विचारले.

‘प्रेमानंदानेही बोलावले आहे. जन्मभूमीला विसरु नकोस, असा त्याचा संदेश आहे,’ करुणा म्हणाली.

‘करुणे, मी जननीलाही विसरलो व जन्मभूमीलाही विसरलो ! मी महान पातकी आहे !’ शिरीष दुःखाने म्हणाला.

‘परंतु करुणेची पुण्याई आपला उद्धार करील. करुणा का निराळी आहे? आपल्या तिघांच्या पापपुण्याचा जमाखर्च एक करु. चालेल ना, करुणे ?’ हेमा म्हणाली.

‘हो, चालेल. तिघांच्या जीवनाचे प्रवाह एकत्र मिळू देत. त्रिवेणीसंगम होऊ दे, सर्वात पवित्र संगम. शिरीष कधी जायचे घरी ?’

‘राजाला विचारीन, मग निघू.’

एके दिवशी राजाला शिरीषने आपल्या अंबर गावी जाण्याची परवानगी विचारली. राजाने आनंदाने दिली. राजा यशोधर आणखी म्हणाला,

‘शिरीष, तुमच्या आईबापांच्या त्या समाध्या जेथे आहेत त्यांच्याजवळ एक प्रचंड स्तंभ उभारला जावा असे मला वाटते. तुम्ही तशी व्यवस्था करा. त्या स्तंभावर करुणेची कथा खोदवा.’

राजाची आज्ञा घेऊन शिरीष घरी आला आणि थोड्याच दिवसानी हेमा व करुणा ह्यांना संगे घेऊन तो आपल्या जन्मभूमीला –अंबरला आला. सारा गाव त्यांच्या स्वागतार्थ सामोरा आला होता. ध्वजा, पताका, तोरणे ह्यांनी सर्व गाव शृंगारण्यात आला होता. प्रेमानंदाने तिघांच्या गळ्यांत हार घातले. मंगल वाद्ये वाजत होती. मिरवणूक निघाली. किती तरी वर्षांनी शिरीष आपल्या जुन्या घरी आला. लोक आता आपापल्या घरी गेले. शिरीषने प्रेमानंदाला मिठी मारली.

« PreviousChapter ListNext »