Bookstruck

जाई 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रामजी व राघो दोघे जीवश्चकंठश्च स्नेही, जणू एका घोटाने पाणी पीत, एका प्राणाने जगत. दिसायला शरीरे दोन, परंतु त्यांचे मन एक होते हृदय एक होते. गावातील सर्वांना त्यांच्या मैत्रीचे कौतुक वाटे.

परंतु काही काही लोकांना ही अभंग मैत्री बघवतही नसे. त्या दोघांचे भांडण व्हावे असे त्यांना मनापासून वाटे आणि खरोखरच एके दिवशी तसे झाले.

त्या दिवशी कशावरूनतरी गोष्ट निघाली. रामजी व राघो हमरीतुमरीवर आले. एकमेकांचे तोंड न पाहाण्याचे त्यांनी ठरविले. राघो जरा मनाने हळवा होता. ज्या गावात आपण इतकी वर्षे परस्पर प्रेमाने वागलो तेथेच इतके भांडलो ह्याची त्याला लाज वाटू लागली. तो घरातून बाहेर पडेना. त्याचे चित्त कशातही रमेना. खाणे पिणे रूचेना. सुखाची झोप येईना. शेवटी तो गाव सोडून दूर देशी निघून गेला.

राघो आज येईल, उद्या येईल अशी त्याची बायको वाट पाहात होती; परंतु राघोकडून ना चिठी ना निरोप. त्याची बायकोही खंगू लागली. ती जेवू लागली म्हणजे नवर्‍याची तिला आठवण येई. पती कुठे असतील, ते जेवले असतील का? असे मनात येऊन तिचे डोळे भरून येत व तिचे जेवण संपे.

असे काही दिवस गेले. राघो परत आला नाही, परंतु त्याच्या मरणाची दुष्ट वार्ता मात्र आली. ती बातमी ऐकून राघोच्या बायकोने हाय घेतली. थोडयाच दिवसांनी तीही देवाघरी निघून गेली; परंतु लहानग्या जाईला आता कोण? ना आई ना बाप. लहान वयात जाई पोरकी झाली. 

रामजीने आपल्या मित्राच्या मुलीला आपल्या घरी आणले. जाईची आई अंथरूणावर असता तो समाचारास जात असे. जाईला मी अंतर देणार नाही, असे मरणोन्मुख मातेला त्याने वचन दिले होते. आपण भांडलो म्हणून राघो गेला. राघोचे प्रेम खरोखर थोर. प्रेमभंग त्याला सहन झाला नाही, असे रामजीच्या मनात येई. मित्रप्रेमाचे ऋण कसे फेडावे? प्रेमाची का फेड करता येते? परंतु मनाचे काही तरी समाधान कृतज्ञता दाखवून मिळत असते. म्हणून रामजीने जाईला जणू आपली मुलगी मानली. तिचे तो सारे करी. तो जणू जाईचा आई-बाप बनला. 

जाई चार-पाच वर्षांची होती आणि रामजीचा मुलगा मोहन, तो सात-आठ वर्षांचा होता. जाई व मोहन एकत्र खेळत. मोहन हूड होता, मोठा खेळकर. जाईही तशीच होती. दोघे शेतावर जात, झोल्यावर झोके घेत. कधीकधी घरीही मोहन जाईबरोबर खेळे. तो तिची बाहुली सजवून देई. तिचा खेळ मांडी. तिच्या भातुकलीत भाग घेई. 'मोहन, तू का मुलगी आहेस?' असे कोणी म्हटले की तो निघून जाई.

« PreviousChapter ListNext »