Bookstruck

जाई 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मोहनच्या मरणाची बातमी रामजीला कळली. जाईला कळली. जाई रडरड रडली. एके दिवशी तिने काहीतरी निश्चय केला. रामजीला न सांगता ती गजरीकडे आली. गजरी मुलाला घेऊन बसली होती. जाई म्हणाली, 'वैनी, आपण दोघी एकत्र राहू. दोघी मिळून हया बाळाला वाढवू. कधी तू कामाला जा, कधी मी जाईन.'

गजरी म्हणाली, 'तुम्ही आपला सुखाचा जीव दु:खात का घातला? मामंजी तुम्हाला पुन्हा घरात घेणार नाहीत. आम्ही दु:खात आहोत तेवढं पुरे. होईल कसं तरी आमचं. नाही तर ते गेले तिकडे बाळ व मी जाऊ.' जाईच्या डोळयांना पाणी आले. ती केविलवाणी होऊन काकुळतीने म्हणाली, 'वैनी! नको ग अशी कठोर होऊ. ह्या झोपडीत माझं समाधान आहे. ही गरीबी मला प्रिय आहे. मी सुखात का तिथं होते? वैनी! माझ्या मनाची स्थिती कोणाला माहीत? मी दुदैवी आहे. जन्मल्यावर थोडयाच दिवसांत माझे बाबा दूर गेले व मेले. माझी आई मला सोडून गेली. मी ह्यांच्या घरात आले तर इथं पिता-पुत्रांची ताटातूट माझ्यामुळंच झाली. ह्यामुळंच मोहन श्रम करून लवकर मेला. माझा हा पायगुण. मी या सार्‍याला कारण! जन्मताच आईनं माझ्या गळयाला नख का लावलं नाही? देवानं मला जिवंत तरी का ठेवलं? मला काहीच समजत नाही. मला सुख नको; संपत्ती नको; मला ऐषआराम नको; मला गरिबीतच राहू दे. तुझ्याजवळच राहू दे. तू मला नाही म्हणू नकोस.'

जाईने आपल्या मनातील विचार गजरीजवळ बोलून दाखविले. हो ना करता करता गजरी कबूल झाली. आपला मुलगा दारिद्य्राच्या गारठयात कुडकुडावा असे कोणत्या मातेस वाटेल? दारिद्य्रामुळेच मोहन लवकर मेला. हा बाळ तरी शतायुषी होवो असे गजरीला वाटले असेल. ती जाईला म्हणाली, 'मामंजी निग्रही व करारी आहेत. ते बाळाला घेणार नाहीत. तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर करून पाहा. तुम्हाला प्रचीती येईल. माझी ना नाही.'
जाईला आनंद झाला. रब्बीच्या पिकाचा हंगाम होता. गहू तयार झाला होता. शेते सोन्यासारखी पिवळी दिसत होती. रामजीची शेते अपरंपार पीक घेऊन उभी होती. रामजीचा मोहन मरून गेला, परंतु पीक सोळा आणे आले. शेते अशी कधी पिकली नव्हती.

रामजीच्या शेतात कापणी सुरू झालेली होती. खसाखसा विळे चालले होते. कापणारे गाणी म्हणत होते. रामजी एका झाडाखाली बसला होता. देखरेख करावयास, काम करून घ्यावयास तो स्वत: जातीने हजर असे. काम जोरात चालले होते.

« PreviousChapter ListNext »