Bookstruck

जाई 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जाईचे शब्द ऐकून गजरी आनंदली नाही. गजरीचा दु:खी चेहरा पाहून जाईला बरे वाटले नाही. तिने बर्‍यासाठी केले होते; परंतु बाळाच्या आईला ते पसंत का नव्हते? मातृहृदय जाईने कसे ओळखावे? तो धन्य अनुभव, पावन व थोर अनुभव माता होऊनच घ्यावा लागतो. जाई माता नव्हती. त्या जन्मी तरी मी माता होणार नव्हती. अप्रत्यक्ष माता होण्याचे तिचे प्रयत्न होते; परंतु अशा प्रयत्नांनी - दुसर्‍यांची मुले वाढविण्याच्या प्रयत्नांनी - खर्‍या मातेचा अनुभव कसा येणार?

गजरी खिन्न म्हणून जाईही खिन्न झाली. कोणी कोणाशी बोलले नाही. भाकरीचा तुकडा खाऊन दोघी घोंगडीवर पडल्या; परंतु डोळा एकीचाही लागेना. पहाटेचा - प्रहरभर रात्र उरली तेव्हाचा - कोंबडा आरवला. गजरी जाईला म्हणाली, 'आपण बाळ परत आणू. माझा बाळ मामंजींच्या जवळ नको. मी रात्रभर विचार करीत आहे. शेवटी हाच निश्चय मी केला. बाळ परत आणायचा. आपण दोघीजणी जाऊ. तूही माझ्याबरोबर ये.' जाई काय बोलणार? मातेच्या इच्छेपुढे ती काय बोलणार? परंतु खरे सांगावयाचे तर बाळ तिकडे गेल्यापासून जाईलाही हुरहूर लागल्यासारखे वाटत होते. काहीतरी चुकल्यासारखे तिला वाटत होते. तिने फार आढेवेढे घेतले नाहीत, वादविवाद केला नाही. सकाळ केव्हा होते हयाची दोघीजणी वाट बघ होत्या. झोप येईना, म्हणून जाते घालून दोघींनी दळले. लहान मुलांवरच्या गोडगोड ओव्या दोघीजणींनी म्हटल्या.

''मांडीवरला बाळ कशी करी दूर माय
प्राण कसा तो ठेवील वासरा ग वीण गाय॥
तान्हुला ग माझा बाळ नको त्याची ताटातूट जाग जाई झणी ऊठ त्याची माझी करी भेट॥''


अशा ओव्या गजरी म्हणत होती. त्या कविता, त्या ओव्या ती स्वत:च रचून का म्हणत होती? तिच्या हृदयाची का ती हाक होती? तिच्या हृदयाची का ती भूक होती? तिच्या भावनांनी का तिला स्फूर्ती दिली, वाचा दिली?

बाहेर चांगलेच उजाडले. गडी माणसे कामावर जाऊ लागली. सूर्यनारायण सर्वांना हाका मारू लागला; सर्वांना हालवू-नाचवू लागला, हसवू-खेळवू लागला, फुलवू-फळवू लागला. जाई व गजरी दोघी निघाल्या. म्हातारा रामजी आरामखुर्चीत बसून बाळाला खेळवीत होता. गोड द्यावे व मुलाला घ्यावे, गोड बोलावे व मुलाला घ्यावे. गुळाला मुंगी, मधाला माशी, तशी गोडाला मुले. म्हातारा गोड-गोड बोलत होता-

'काऊ काऊ, चिऊ चिऊ इथे इथे बस, चारा खा, दाणा खा आणि बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन् उडून जा.'

« PreviousChapter ListNext »