Bookstruck

बासरीवाला 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका गावात एक श्रीमंत सावकार राहात होता. त्याचा जमीन-जुमला गावोगाव पसरलेला होता. जिकडे पाहाल तिकडे त्याचीच शेती, जिकडे पाहाल तिकडे त्याचीच घरे. हजारो लोकांच्या घरादारांचे लिलाव त्याने केले होते. शेतकर्‍यांना तर तो काळ वाटे. शेतकर्‍यांची गाईगुरे, भांडीकुंडी सारे त्याने जप्त करून न्यावे. त्याच्या नावाने सारी आसपासची श्रमणारी दुनिया बोटे मोडीत असे. शेतकर्‍याने पाऊसपाण्यात, उन्हातान्हात, ढोपरढोपर चिखलात श्रमून, खपून धान्य निर्माण करावे; परंतु सावकाराची झडप यावी व सारे नाहीसे व्हावे. खंडोगणती धान्य निर्माण करणार्‍या शेतकर्‍यांस शेवटी उपास पडत. त्यांची मुले अर्धपोटी राहात. अशा ह्या दु:खी कष्टी लोकांचे शिव्याशाप त्या सावकाराला मिळत. त्याला कोणी बरे म्हणत नसे. तो भेटला तर त्याला राम राम करीत; परंतु त्याची पाठ वळताच 'मरत का नाही छळवाद्या' असे वैतागाने म्हणत.

त्या सावकाराचे नाव धोंडोपंत. धोंडयासारखे त्याचे मन घट्ट होते. दयामया त्याला माहीत नव्हती. दुसर्‍याच्या डोळयांतील पाणी पाहून धोंडोपंत हसे. अश्रूंची थट्टा करणे ह्याहून वाईट काय आहे? परंतु धोंडोपंतास त्याची किंमत कळत नसे. एकच गोष्ट तो ओळखी, ती म्हणजे पैसा. धोंडोपंताचा देव पैसा. पैसा हे त्याचे परब्रह्म.

धोंडोपंताला एकच मुलगा होता. भांगेत तुळस तसा तो होता. मातीच्या पोटी कस्तुरी तसा तो होता. त्याचे नाव मनोहर. त्याला सारे मन्या अशी हाक मारीत. मन्या गोड मुलगा होता. दिसे चांगला, तसे त्याचे मनही चांगले होते. गरिबांचे अश्रू त्याला समजत. आपल्या घरी येऊन शेतकरी रडतात,  बाबा कसे त्यांना बोलतात, हे तो बघे; परंतु तो लहान होता. किती दिवस लहान राहाणार? तो हळुहळू शरीराने व मनाने मोठा होत होता. आईबापांचा एकुलता एक मुलगा. त्याचे कोडकौतुक होत होते. त्याच्या अंगावर दागिने होते, सुंदर कपडे होते. मन्याला काय कमी?

गावात मन्याला जिकडे तिकडे वडिलांची निंदा ऐकू येई. तो शाळेत गेला म्हणजे मुले म्हणत, 'गरिबांना रडवणार्‍या धोंडोपंताचा हा मुलगा.' कधी दुकानात गेला तर 'गरिबांचा काळ धोंडोपंत त्यांचा हा मुलगा.' असे शब्द त्याच्या कानांवर येत. मन्याला वाईट वाटे. त्याला दागिने अंगावर घालवत ना, तलम वस्त्रे नेसवत ना, वापरवत ना. त्याला गरिबांचे दु:ख, त्यांच्या मुलांचे आक्रोश त्यात ऐकू येत. मन्या गरिबीने राहू लागला. तो शाळेतही जातनासा झाला.

« PreviousChapter ListNext »