Bookstruck

बासरीवाला 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

लिली म्हणाली, 'मन्या! आई रोज मला खाऊ देई, परंतु तो मी कधी खाल्ला नाही. हा बघ सारा जमवून ठेवलेला आणला आहे. ये आपण खाऊ.'

दोघांनी खाऊ खाल्ला. लिली म्हणाली, 'मन्या, तू घरी का राहात नाहीस? वडिलांच थोडं ऐकावं. तुझ्या वडिलांनी तुझ्याकडे येण्याची मला बंदी केली आहे. म्हणतात कसे, 'एकटयाला कंटाळू दे म्हणजे झक्कत घरी येईल!' 'मन्या, ये ना रे घरी, आपण रोज खेळू, रोज बोलू.'

मन्या म्हणाला, 'माझ्या बाबांना सारं जग नावं ठेवतं. तुझ्या मन्यालाही सार्‍यांनी निंदावं असं तुला वाटतं का? मला माझ्या घरी राहावत नाही. तिथं पाप आहे, अन्याय आहे. मला गोरगरिबांच्या किंकाळया तिथं ऐकू येतात. तुझ्या मन्याचा जीव तिथं होरपळू लागतो. गुदमरू लागतो. त्या हवेत मी जगू शकणार नाही. हा मन्यापक्षी रानातील मोकळया, प्रेमळ व सुंदर हवेतच नांदू शकेल, जगू शकेल.'

मन्याने नंतर बासरी वाजविली. लिली वेडी झाली. डोळे मिटून ती बसली होती. बासरी थांबली तरी तिची समाधी सुटली नाही. ती भानावर आली. ती सदगदित होऊन मन्याला म्हणाली, 'मन्यादादा! मला शिकवशील बासरी वाजवायला? मी चोरून येईन व शिकत जाईन.' मन्या म्हणाला, 'ये, तुझ्यासाठी एक दुसरी बासरी मी तयार करीन.'

लिली निघून गेली. मधूनमधून ती बासरी वाजविण्याचा घरी सारखा अभ्यास करी. तिची आई रागावून म्हणे, 'काय ग सारखी कटकट!' लिली म्हणे, 'कैरी आंबट असते, परंतु काही दिवस गेले की तीच रसाळ व गोड होते. आई, आज तुला कटकट होत आहे, परंतु मला चांगलं वाजविता येऊ लागलं की तूच म्हणशील, 'लिल्ये, वाजव ग जरा बासरी.' मन्यादादा वाजवतो तेव्हा पाषाणही ओले होतात, नदी वाहाण्याचं विसरून थबकते.'

एके दिवशी लिली मन्याकडे गेली होती. त्या दिवशी मन्याची बासरी घेऊन लिलीने वाजविली. मन्या ध्यानस्थ झाला. मन्यापेक्षाही लिली उत्कृष्ट वाजवू लागली. मन्या म्हणाला, 'तुझ्या कोमल हातांनी तू वाजविलीस, तुझं प्रेमळ हृदय तू ओतलंस, म्हणून माझ्यापेक्षा दिव्य संगीत तू निर्माण केलंस. स्त्रियांचं जीवन हळुवार, सोशिक, पवित्र व प्रेमळ असं असतं. म्हणूनच तुला असं वाजविता आलं.'

« PreviousChapter ListNext »