Bookstruck

अश्रूंचे तळे 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जेवणार्‍यांना श्रम होत होते. शेतात काम करणार्‍या मजुराला घाम सुटत नाही, इतका घाम लाडू फोडताना व तो तोंडात टाकताना त्यांना येत होता. श्रमाचा विसर पडावा म्हणून रेडिओ लावले होते. घाम जिरावा म्हणून पंखे फिरत होते. थोरा-मोठयांचे जेवण ते का पाचदहा मिनिटांत आटपणार होते? तास दोन तास पंगत चालली होती.

बाहेर दाराशी ही कसली गर्दी? ही मंडळी कोणाच्या मेजवानीसाठी आली आहेत? हयांना कोणी बोलावले? प्रेमाला बोलावणे लागत नाही. भिकार्‍याचे सर्वांवर प्रेम असते. तो सर्वांच्या घरी जातो. त्या धर्मशाळेतील शेकडो भिकारी तेथे जमले होते. पानातील उष्टेमाष्टे मिळावे म्हणून ते आले होते. दारातील उध्दट नोकर त्यांना दरडावीत होता. 'अजून पंगत उठली नाही, तो आले कुतरे. ओरडाला तर खबरदार, वर बडी बडी मंडळी जेवत आहेत, तुम्हाला लाज नाही वाटत? कावळयांची जशी कावकाव, कोल्हयांची कोल्हेकुई, तसं तुम्ही चालवलं आहे. गडबड कराल तर काही देणार नाही.' नोकर व्याख्यान देत होता.

'नको रे दादा असं करू. आम्ही गप्प बसतो. दोन दिवसांचे उपाशी आहोत. धन्याला पुण्य लागेल. ताईबाईला आठ लेकरं होतील.' वगैरे बोलणी भिकार्‍यांची चालली होती.

मेजवानीच्या ठिकाणचे दृश्य व हे रस्त्यावरील दृश्य ही दोन्ही दृश्ये पाहून त्या नगरच्या वैभवाची खरी कल्पना आली असती. आत संपत्ती होती; बाहेर विपत्ती होती. आत संगीत होते, बाहेर रडगाणे होते. आत ढेरपोटये होते, बाहेर खोलपोटये होते. आत विपुलता होती, बाहेर दुर्मिळता होती. आत सुकाळ होता, बाहेर दुष्काळ होता. आत अजीर्ण होते, बाहेर उपासमार होती. आत सुख होते, बाहेर दु:ख होते. आत आनंद होता, बाहेर खेद होता. आत जीवन होते, बाहेर मरण होते. आत सन्मान होता, बाहेर मिंधेपणा होता. आत स्वर्ग होता, बाहेर नरक होता. आत चष्मे होते, बाहेर आंधळे होते. आत पोषाखी होते, बाहेर उघडे होते. आत खाण्याचा आग्रह चालला होता, बाहेर नोकर गुरगुरत होता. आत पंखे होते, बाहेर ऊन होते. आत थंडगार होते, बाहेर झळा होत्या. ती दोन दृश्ये - त्यांतील विरोध अंगावर शहारे आणणारा होता, हृदय हलविणारा होता, विचार जागृत करणारा होता.

बडी मंडळी उठली. त्यांनी करकमळांचे प्रक्षालन केले. हात-रूमालांनी पुसून ते दिवाणखान्यात गेले. सुंदर रेशमासारख्या मृदू पिकलेल्या पानांचे तांबूल मुखकमलांत जाऊ लागले. ओठ रंगू लागले. मिशावंतांच्या थोडया मिशाही रंगल्या. गायनाला रंग चढला, परंतु गाणे ऐकता ऐकता थकलेली मंडळी लोडांजवळ वामकुक्षी करू लागली.

« PreviousChapter ListNext »