Bookstruck

मातृभक्ती 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आई एकटीच देवापाशी बसली होती. गोपाळाबद्दलचेच विचार मनात येऊन ती कष्टी झाली होती. तिला त्याच्याबद्दल वाईट वाटत होते. इतक्यात गोपाळ आला. स्फुंदत स्फुंदतच तो आईजवळ गेला. जगातला एवढाच एक काय तो त्याचा आधार होता. आईला मिठी मारून गोपाळ रड रड रडला. आईचे हात आपल्या हातांत घेऊन तो म्हणाला, 'आई, माझा काय बरं दोष? मी अभ्यास का करीत नाही? किती तरी करतो; पण माझ्या लक्षात राहात नाही व समजतही नाही. देवानं मला शहाणपण दिलंच नाही. अभागी आहे तुझा मुलगा!'

आईने गोपाळच्या डोक्यावर आपला प्रेमाने भरलेला हात ठेवला व वात्सल्यपूर्ण स्वराने ती म्हणाली, 'बाळ, देव तुझं चांगलं करील हो.' गोपाळ बाहेर गेला व आई कामाला लागली. आई हे परम थोर दैवत आहे. हुशार मुलांपेक्षा मूर्ख मुलांवरचं आईचे प्रेम अधिक असते. शहाण्यासुरत्या मुलांचे कसेही होईल, परंतु जो अडाणी त्याचे कसे होईल हीच आईला चिंता असते.

गोपाळ व त्याचे भाऊ हयांचे हयाप्रमाणे शिक्षण चालले होते. तिघे भाऊ मॅट्रिकच्या वर्गात होते. गोपाळ दर वर्षी नापास होई, तरी त्याला वरती घालण्यात येत असे. त्याला मॅट्रिकलाही पाठविण्यात आले. परीक्षेचा निकाल लागला. वामन व हरी हे फारच चांगल्या तर्‍हेने पास झाले. त्यांना शिष्यवृत्या मिळाल्या. परंतु पास झालेल्या मुलांत गोपाळचे नाव नव्हते. वामन व हरी हयांची जो तो स्तुती करीत होता. भावांची स्तुती ऐकून सहृदय व निर्मत्सर गोपाळला आनंद होत होता. आईला तो म्हणाला, 'आई, मी गावात गूळ वाटतो.' आईने त्याच्याजवळ गूळ दिला. गोपाळ गावात सर्वांना म्हणे, 'माझे भाऊ पहिले आले. ते आता पुढे मोठे होतील. घ्या गूळ.' लोक गोपाळला हसत होते. काही त्याला म्हणाले, 'अरे, अगदीच वेडबंबू दिसतोस! तू नापास झालास तरी गूळ काय वाटतोस? घरात एका कोपर्‍यात रडत बसायचं ते सोडून भावांचंच नाव सांगण्यात फुशारकी काय मिरवितोस? तुला काही लाज आहे का नाही?' गोपाळ शांतपणे त्यांना म्हणाला, 'मी नापास झालो म्हणून काय झालं? माझे भाऊ पास झाले, त्यांना स्कॉलर्शिप मिळाली, म्हणून सार्‍या गावाला आनंद होत आहे. मग मी तर त्यांचा भाऊच आहे; मला आनंद नाही का होणार? माझ्या आईला आनंद झाला आहे, माझ्या भावांना आनंद झाला आहे, मग मी का रडत बसू? त्यांच्या आनंदात माझं दु:ख मी कधीच विसरून गेलो. माझ्या आईचं सुख, माझ्या भावांचं सुख, त्यातच माझं सारं सुख!' गोपाळाचे हे बोलणे ऐकून लोक आणखी मोठयाने हसत व म्हणत, 'अगदी अजागळ आहे, हयाला काही समजत नाही!

वामन व हरी पुढे कॉलेजात गेले. ते हुशार होते. भराभरा परीक्षा पास होत गेले. पाच-सहा वर्षे झाली. हरी आता मुन्सफ झाला व वामन इंजिनिअर झाला. दोघांना सुदैवाने मोठाल्या सरकारी नोकर्‍या मिळाल्या. त्यांनी तिकडेच लग्ने केली, संसार थाटले, मोठमोठया बंगल्यांमधून ते सुखाने राहू लागले. नोकर-चाकर, गडी-माणसे, गाडी-घोडा-कशाची तूट नव्हती.

« PreviousChapter ListNext »