Bookstruck

मातृभक्ती 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गाडया निघाल्या. 'जपा सारी जणं--' म्हातारी म्हणाली. 'पत्र पाठवा-' गोपाळ म्हणाला, बैल पळत गेले. धूळ दिसत होती. काही वेळ गोपाळ बघत होता. मग तो घरात आला. त्याचे डोळे ओले झाले होते.

'गोपाळ, रडू नकोस. तुला मी व मला तू. देव त्यांना तिकडे सुखी ठेवो. उदंड आयुष्य देवो.' ती गोपाळच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हणाली.

गोपाळ पुन्हा पूर्वीप्रमाणे कामावर जाऊ लागला; परंतु एके दिवशी सायंकाळी घरी आला तो आई निजलेली होती. त्याच्या पोटात धस्स् झाले.

'आई, निजलीसशी?' त्याने घाबर्‍याघाबर्‍या विचारले.

'काही नाही रे. जरा अंग कणकण करीत आहे. तसे विशेष काही नाही.' ती म्हणाली.

जेवणे झाली. गोपाळने आईचे पाय चेपले. आईचे अंग जरा कढत लागले. दुसर्‍या दिवशी तो कामावर गेला. सायंकाळी घरी आला तो आई निजलेली. त्याने आईच्या कपाळाला हात लावला, तो कपाळ कढत कढत लागले. आईला खूप ताप होता. गोपाळने दोन घास खाल्ले व तो आईजवळ बसला.

आईचा ताप सकाळी निघाला नाही. गोपाळ कामावर गेला नाही. एक दिवस झाला, दोन झाले, चार झाले. ताप निघेना. गोपाळ आता कामावर थोडाच जाणार? तो रात्रंदिवस आईजवळ असे. जे उपचार त्याला करता येण्यासारखे होते, ते तो करीत होता. त्याचे कामगार-बंधू त्याला रात्रीच्या वेळी मदत करावयास येत.

आई वामनची व हरीची आठवण करी. गोपाळने शेवटी त्यांना तार केली.

'आले का रे वामन हरी? लहान जगू आला का? मी आता वाचणार नाही. येणार आहेत का?' आईने विचारले.

'आई, ते आताच गेले. त्यांना रजा कशी मिळणार?' गोपाळ म्हणाला.

'परंतु तारेचं उत्तर आलं का?' तिने विचारले.

« PreviousChapter ListNext »