Bookstruck

घामाची फुले 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जेथे शबरी राहात होती, तो एक जुना आश्रम होता. तेथे आता ती एकटीच राहात होती. त्या आश्रमाच्या समोर दूरवरपर्यंत दृष्टी जाईल तेथवर फुलेच फुले दिसत होती. सुंदर सुंगधी फुले. रामचंद्र सारखे त्या फुलांकडे बघत होते. शेवटी ते शबरीला म्हणाले, 'शबरी, कुणी लावली ही फुलं? कशी दिसतात छान! वासही किती गोड येत आहे!'

शबरी म्हणाली, 'रामा, तो एक इतिहास आहे. मी सांगत्ये ऐका. पुष्कळ वर्षांपूर्वी इथं मतंग ऋषींचा आश्रम होता. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. नाना ठिकाणचे विद्यार्थी त्यांच्या आश्रमात शिकण्यासाठी येऊन राहिले. भिल्लांची मुलंही शिकण्यासाठी येऊ लागली. मतंग ऋषी फार प्रेमळ. ते जसे प्रेमाचे सागर होते, तसेच ज्ञानाचे. आपल्या आश्रमातील मुलं पुढं चांगली व्हावीत म्हणून ते झटत.

एकदा काय झालं? उन्हाळा संपत येत होता. थोडयाच दिवसांनी रोहिणी, मृग ही पावसाची नक्षत्रं सुरू होणार होती; परंतु पावसाळयासाठी म्हणून आश्रमात जळणाची काहीच तरतूद केलेली नव्हती, लाकडे साठवलेली नव्हती. पावसात का ओली लाकडे पेटणार? स्वयंपाक कसा होणार? उन्हाळयाचे अद्याप चार दिवस आहेत, तोच जंगलातून वाळलेल्या लाकडांच्या मोळया आणून ठेवल्या पाहिजे होत्या; परंतु कोण जाणार व आणणार?

मुलं आपण होऊन रानात जातील असं मतंग ऋषींना वाटत होतं; परंतु मुलं गेली नाहीत. शेवटी एके दिवशी वृध्द मतंग ऋषी हातात कुर्‍हाड घेऊन निघाले ते निघाले. असं पाहाताच सारी मुलंही निघाली. आश्रमात उतरलेले मोठमोठे ऋषीमुनी तेही निघाले महापुरूष पुढं होताच सारी दुनिया त्याच्या पाठोपाठ येऊ लागते.

सर्व लाहनथोर मंडळी रानात गेली. लाकडे तोडू लागली. लाकडांचा ढीग पडला. मग लहानमोठया मोळया बांधण्यात आल्या. लहानांच्या डोक्यावर लहान, मोठयांच्या डोक्यावर मोठया. स्वत: मतंग ऋषींनीही डोक्यावर मोळी घेतली होती. मंडळी आश्रमात येण्यासाठी निघाली. तिसरा प्रहर होत आला. सर्व घामाघूम झाले. अंगातून घाम ठिपकत होता. ते घामाचे थेंब भूमीवर पडत होते.

आश्रम आला. सर्वांनी विसावा घेतला. आज रात्री अध्ययन नव्हतं. सर्व मंडळी लौकरच झोपली. सारे थकले होते. भगवान मतंग ऋषी मात्र ध्यान करीत होते. आपल्या आश्रमातील मुलं पुढे चांगली निघोत, जगाची सेवा करोत, अशी ते प्रभूला प्रार्थना करीत होते.

« PreviousChapter ListNext »