Bookstruck

फुलाला फाशीची शिक्षा 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘वाईट करणार्‍याला मरणाचे भय. मी कधीही वाईट गोष्ट केली नाही. मी फुले फुलविली, काळया फुलविल्या. त्यांचे रंग वाढवले, गंध वाढवले. मला कसले भय? आता देवाच्या नंदनवनात काम करीन. पृथ्वीवरचा हा फुलमाळी देवाला आवडला असेल म्हणून तो नेत असेल.’

‘माझं नाव तुम्हाला माहीत आहे?’
‘नाही.’

‘माझे नाव कळी.’

‘किती गोड नाव।’

‘परंतु कोण मला फुलवणार?’

‘भेटेल योग्य असा माळी.’

‘योग्य माळी भेटला; परंतु तो तर चालला!’

‘देवाची दुनिया ओस नाही.’

‘मरणाला मिठी मारण्याचे धैर्य तुम्हाला कोणी दिले? कोणी शिकविले?’

‘हया लहानशा पुस्तकाने.’

‘काय त्याचे नाव?’

‘श्रीमद्भगवद्गीता.’

‘हे पुस्तक मरायला शिकविते?’

‘जगायलाही शिकविते. कर्तव्यकर्म करीत सुखाने कसे मरावे तेही हयात सांगितलेले आहे. जगणे मरणे म्हणजे झोका. गंमत आहे ती. तुम्ही मोठया झालात म्हणजे हे पुस्तक वाचा.’

‘परंतु कोण शिकवील वाचायला?’’

‘तुम्हाला वाचायला येत नाही?’

‘नाही.’

‘का बरे?’

‘बाबा म्हणतात, शिकल्याने मुली बिघडतात.’

‘खोटी कल्पना. ज्ञान म्हणजे परमेश्वर. ज्ञानाने मनुष्य खरा मनुष्य होतो. ज्ञानाने नम्रता येते, निर्भयताही येते. ज्ञानाने अनेक प्रश्न सुटतात, अनेक गोष्टी कळतात, वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे, ते तुम्ही मिळवा.’


« PreviousChapter ListNext »