Bookstruck

राज आला, फुला वाचला 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

फुलाचा तो शेजारी गब्रू राजधानीत आला होता. फुलाला फाशीची शिक्षा झाल्याचे त्याला कळले. फुलाच्या अंगरख्याच्या खिशात ती कलमे आतील, ते प्रयोग असतील; परंतु कसा मिळावावयाचा तो अंगरखा? फुलाला त्याच्या कपडयांतच फाशी देतील का? सरकार स्वत:चे कपडे कशाला खर्च करील? फुलाच्या प्रेताची व्यवस्था कोण करणार? ते मांगच बहुधा ते काम करतील. त्या मांगाकडे जावे. फुलांचे कपडे त्यांनी द्यावे असे ठरवावे.

गब्रूच्या मनात असे विचार आले. फाशी देणार्‍या मांगाच्या घरी तो गेला. मांगाच्या मांडीवर लहान मूल होते मांग त्या मुलाला खेळवीत होता.

‘तुम्हीच ना त्या कैद्याला उद्या फाशी देणार?’ गब्रूने विचारले.

‘हो. काय काम आहे?’

‘तुम्हाला एक विचारायचे आहे.’

‘तुम्ही का फाशी जाणार्‍याचे नातलग?’

‘हो.’

‘मग?’

‘त्यांना फाशी दिल्यावर ते प्रेत माझ्या ताब्यात द्या प्रेत न देता आले, तर निदान त्याच्या अंगावरील कपडे तरी द्या. तेवढी आठवण राहील. ते कपडे आम्ही घरात ठेवू. तेच पाहू. नाही म्हणू नका.

‘प्रेत नाही देता येणार. कपडयाचे पाहीन. परंतु तुम्ही मला काय द्याल?’

‘मी काय देणार?’

‘काही तरी दिले पाहिजे. माझ्या हया मुलाबाळांना नको का सुख?’

‘तुम्ही फाशी देता, तरी मुलांना खेळवता. तुम्ही कठोर नाही झालेत?’

‘वाघीण का पिलांना चाटीत नाही? आणि फाशी देणे आमचा धंदा आहे. आम्ही क्रूर नाही. पटकन कसे फाशी द्यावे ते आम्हाला समजते. फाशीची शिक्षा झाल्यावर कोणी तरी फाशी देणारा हवा ना? हालहाल होऊ न देता पटकन फास बसेल असे करणारा नको का कोणी? फाशी जाणारा पटकन मरेल हयाची मी काळजी घेतो; परंतु फाशी दिल्यावर मला काय मिळते? तुरूंगाच्या अधिकार्‍यांना प्रत्येक फाशीच्या शिक्षेस हजर राहाण्याबद्दल वीस-वीस रुपये मिळतात, तर आम्हाला म्हणजे प्रत्यक्ष फास लावणार्‍यास दोन-दोनच रुपये! असो. काय देणार बोला.’

« PreviousChapter ListNext »