Bookstruck

समुद्रकाठच्या तुरुंगात 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘कोठे जायचे बाळ?’

‘बाबा, समुद्रकाठी घ्या ना बदली करून! किती दिवसांत मी समुद्र पहिला नाही. अगदी लहानपणी पाहिला होता. समुद्राच्या लाटात पुन्हा एकदा डुंबू दे. खेळू दे. वाळूत किल्ले बांधू दे. बाबा, नदीला समुद्राकडे जावेसे वाटते. तसे मला झाले आहे. उचंबळणारा समुद्र पाहून तुमच्या कळीचे मन उचंबळेल. मी सुंदर-सुंदर शिंपल्या गोळा करीन, सुंदर खडे गोळा करीन, घ्या ना बदली करून.’

‘अर्ज करून बघतो; परंतु तू खात जा, पीत जा. कळये, तू दु:खी असलीस म्हणजे मला मग काही सुचत नाही. तू आनंदी राहा.’

‘मी का मुद्दाम दु:खी असते बाबा? खोटे-खोटे हसू किती वेळ टिकणार? खोटे हसणे, खोटे रडणे म्हणजे अळवावरचे पाणी.’

ढब्बूसाहेबाने कोठे तरी समुद्रकाठच्या तुरूंगावर बदली व्हावी, मुलगी आजारी आहे, तिला तेथे बरे वाटेल, असे लिहून अर्ज केला. अर्ज राजाकडे गेला. राजाने विचार केला, फुला प्रथम हयाच अधिकार्‍याच्या ताब्यात होता. फुला ज्या तुरुंगात आहे, त्याच तुरुंगावर हयाची बदली केली तर बरे होईल असे राजाला वाटले. शेवटी ढब्बूची बदली झाली. त्या समुद्रकाठच्या तुरुंगाचा अधिकारी म्हणून तो गेला. कळीही अर्थात तेथे गेली.

ढब्बूसाहेब तुरूंगाची पाहाणी करीत होते. पाहाता-पाहाता फुलाच्या कोठडीजवळ ते आले. तेथे फुला होता. तो उभा होता. बागेतील फुलांकडे बघत होता.

‘काय ठीक आहे ना? फाशीतून वाचलेत. आता नीट वागा, तुरूंगाची शिस्त पाळा. मी मोठा कडवा आहे. शिस्त पाळणार्‍याला मी चांगला आहे. शिस्तभंग करणार्‍याला मी वाईट आहे’. ढब्बुसाहेब म्हणाले.

ढब्बूसाहेब निघून गेले. फुला पाहात होता. त्याला आनंद झाला होता. कळीही आली असेल. ती येईल, ती भेटेल, ती बोलेल, फुलाने खोलीत उडया मारल्या. खिडकीतून भरती आलेला समुद्र त्याने पाहिला. त्याच्याही मनात सुखकारक कल्पनांच्या लाटा उसळत होत्या. आनंदाला भरती आली होती.

दुपारची एक- दोन वाजण्याची वेळ होती. ढब्बूसाहेबांची ती वामकुक्षीची वेळ. पिता निजला आहे असे पाहून कळी उठली. ती एकदम फुलासामोर येऊन उभी राहिली, दोघे हसली, आनंदली. तिने गजातून आपले हात आत घातले. त्याने ते धरले. तो तिच्या हातावर बोटाने लिहू लागला. काय लिहित होता? ‘समजले का काय लिहिले ते?’ त्याने विचारले.

« PreviousChapter ListNext »