Bookstruck

तुरुंगातील प्रयोग 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ढब्बूची एकुलती एक मुलगी. ती घरातून गेली. हे पाहून तो निराश झाला. तो संतापला, चिडला. धावत धावत त्या फुलाच्या कोठडीकडे तो गेला. शिपाई बरोबर होता. खोली खोलण्यात आली. संतापलेला ढब्बूसाहेब फुलाला शिव्या देऊ लागला.’ बदमाष, कोठे गेली माझी मुलगी? बोल. हरामखोर, काय केलास जादूटोणा? बोलं.’ साहेब फुलाला मारू लागला. फुलाही संतापला. त्याच्या मनातील सारे साठलेले जागे झाले. तो एकदम ढब्बूवर घसरला. त्याने ढब्बूस खाली पाडले. फुला त्याच्या छातीवर बसला. हत्ततीवर सिंहाचा छावा तसे ते दृश्य दिसत होते. फुला त्या ढब्बूच्या थोबाडीत दोहोकडून देत होता.

शिपायाने शिटी वाजविली. जिकडे-तिकडे शिटया झाल्या. धोक्याची घंटा घणघण वाजू लागली. सारे शिपाई वॉर्डर दंडुके घेऊन धावत आले. फुलाला ओढण्यात आले. साहेब उठले. ते थरथरत होते. शिपायांनी फुलाला दंडे मारले.

‘हरामखोर! अधिकार्‍यांवर हात टाकतोस? थांब. हयाला जडांतील जड अशी दंडा-बेडी घाला. मागे मरणातून वाचलास. आता वाचणार नाहीस. अधिकार्‍यावर हात टाकाणार्‍यास तोफेच्या तोंडी देण्यात येते. तयार राहा मरणाला. आजच्या आज वर कळवतो. घाला, बेडया घाला हरामखोराला.’ असे म्हणत ढब्बूसाहेब खाली गेले.

फुलाला दंडा-बेडी घालण्यात आली. मला तोफेच्या तोंडी देणार? देऊ देत. माझा प्रयोग यशस्वी झाला आहे. आता मरण आले तरी काय हरकत? परंतु मरणापूर्वी कळी भेटेल का? माझी कळी मला दिसेल का? फुलराणी किती गोड, किती शहाणी?

« PreviousChapter ListNext »