Bookstruck

घरी 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वृध्द आत्या घरी होती. एक दिवस सारे चांगले होईल हया आशेवर ती जगत होती. फुलाच्या बागेची काळजी घेत होती आणि एके दिवशी फुला घरी आला. एकटा नाही आला, तर त्याच्या बरोबर कोणी तरी होते.

‘आत्या, ओळखलेस का मला?’’ फुला पाया पडून म्हणाला.

‘अरे, तुला का मी ओळखणर नाही? आलास ! मी म्हणतच होते की, तू येशील. किती रे वाळलास? तुरूंगातून जिवंत आलास हीच देवाची कृपा. आणि ही कोण?’

‘तुला सून आणली आहे. राजाने माझे लग्न लावले. चांगली आहे की नाही सून? म्हणत असंस, लग्न कर. झाले ना आत तुझ्या मनासारखे?’ फुलाने प्रेमाने विचारले.

कळी आत्याबाईच्या पाया पडली. ‘जन्मसावित्री हो’ असा म्हातारीने आशीर्वाद दिला. तिने त्या दोघांच्या डोक्यावरुन प्रेमळ हात फिरविला. तिला खूप आनंद झाला.

नंतर एके दिवशी कळी व फुला कळीच्या वडिलांकडे गेली. उभयता पाया पडली. फुला म्हणाला, ‘मला क्षमा करा!’’ म्हातारा गहिवरला.

‘मी आता नोकरी पुरे करतो. तुमच्याकडे येऊन राहातो. येऊ ना कळये?

मी एकटा कसा राहू इकडे?’’ पिता म्हणाला.

‘तुम्हाला न्यायलाच आम्ही आलो आहोत. आता विश्रांती घ्या. आमचा संसार पाहा. तुमचा आशीर्वाद द्या.’

‘तो लफंगा बसला आहे तुरूंगात. त्याला मी जावई करणार होतो. देवाने वाचविले. कळीचे नशीब थोर!’ म्हातारा म्हणाला.

ती सारी फुलाच्या घरी आली. फुला व कळी फुले फुलवू लागली. त्यांचा जोडा फार शोभे. गावातील म्हातारी माणसे त्यांचे कौतुक करीत. फुलाच्या बागेचे ढब्बूसाहेब रक्षण करी. लहान मुले-मुली फुले तोडायला येत. त्यांना तो दटावी; परंतु शेवटी फुले देई.

कळी व फुला हयांचा संसार सुखाचा झाला. त्यांना जसे सुख मिळाले तसे तुम्हा सर्वांस मिळो ! संपली ही कथा - हरो सर्वांची  व्यथा.

संपली फुलाची गोष्ट, होवोत वाचणारे संतुष्ट.

« PreviousChapter ListNext »