Bookstruck

मधुरीची भेट 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘तुमचे प्रेम आहे माझ्यावर?’ तिने विचारले

‘हो’

‘खरोखर?’

‘खरोखर.’

‘आता जा. आई येईल; परंतु पुन्हा कोठे भेटाल?’

‘गावाबाहेरच्या बागेत. तेथे सायंकाळी ये. आपण बोलू. एके ठायी बसू. हात हातात घेऊ. खरेच ये. येईन म्हण. कबूल कर.’

‘येईन. सायंकाळी येईन. माझी वाट पाहा. मला काम असते ते आटोपून येईन जरा उशीर झाला तर जाऊ नका. हिने फसवले असे म्हणू नका रागावू नका. तुमचे प्रेम आहे ना माझ्यावर? प्रेम रागावणार नाही. खरे ना?’

‘हो, मी वाट बघेन. तुझ्याकडे डोळे लावून बसेन.’

‘मी आता जाते. धुणी धुवायची आहेत.’

‘आम्ही जातो.’

ते दोघे निघून गेले, ती मुलगी निघून गेली. धुणी धुवायला गेली. हार लपवून ठेवून ती गेली. ती धुणी धूत होती. तिच्या मनात किती कल्पना येत होत्या. किती विचार उसळत होते. एकदाची झाली धुणी धुवून. ती धुणी लोकांकडची होती. त्यांच्याकडे जाऊन ती वाळत घालून ती घरी आली. पुन्हा तो हार गळयात घालून बसली.

दुपार झाली. गिरणीचा भोंगा झाला. तिचा भाऊ गिरणीत कामगार होता. तो घरी आला. भाऊबहीण जेवायला बसली. आई वाढत होती. भाऊ झटपट जेवून गेला. त्याला वेळ कुठे होता! वेळेवर गेले पाहिजे. क्षणाचा उशीर झाला तर दंड असे. शिव्या खाव्या लागत.

‘आई, भाऊचे लग्न कधी ग होणार?’ बहिणीने विचारले.
‘देवाला माहीत. आधी तुझे हवे करायला. मग त्याचे. माझ्या डोळयादेखत एकदा तुमचा संसार सुरू झाला म्हणजे झाले. दुसरी माझी आता इच्छा नाही.

मग डोळे मिटले तरी चालतील,’ आई म्हणाली.

« PreviousChapter ListNext »