Bookstruck

मधुरीची भेट 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मधून मधून माधव व ती मुलगी हयांच्या भेटी होत. चोरून कोठे तरी जात. बोलत बसत. प्रेमाच्या गोष्टी होत. आज पुन्हा त्या बागेत दोघे बोलत होती.

‘तुमच्या बरोबर तो कोण असतो?’

‘माझा मित्र.’

‘त्याची संगत सोडून द्या. त्याला बघताच हद्यात चर्र होते. माझी छाती धडधड करते. चांगला नाही तो माणूस. दृष्ट दिसतो. कपटी दिसतो त्याचे हसणे भेसूर वाटते. खरेच सांगते मी. त्याची संगत सोडा.’

‘तुम्ही बायका भित्र्या. काय करणार आहे तो?’

‘मी तुम्हाला एक विचारू?’

‘एक का, दहा प्रश्न विचार.’

‘तुम्ही कधी देवळात जाता का?

‘मी कधी देवळात जात नाही.’

‘का बरे? तुमचा देवावर विश्वास नाही?’

‘देवळात जातो त्याचाच का फक्त विश्वास असतो? तू वेडी आहेस. मी हया विश्वमंदिरात देवाला बघतो. तो सर्वत्र आहे. ज्याने सूर्यचंद्र निर्माण केले, तो का फक्त देवळात आहे? तो अणुरेणूत आहे. तो चराचरात आहे. तो माझ्यात आहे. तो तुझ्यात आहे. तुझे व माझे डोळे भेटतात. हदयाच्या तारा छेडल्या जातात. कोण करतो हे सारे? हा सारा त्याचाच खेळ, त्याचीच लीला. तो परमेश्वर ओतप्रोत भरलेला आहे. ते चैतन्य सर्वत्र विलसत आहे. त्याला राम म्हणा, रहीम म्हणा; अल्ला म्हणा, प्रभू म्हणा, परमेश्वर म्हणा; नाव कोणतेही द्या. मुख्य गोष्ट ध्यानात घेतली म्हणजे झाले.’

‘किती सुंदर बोलता तुम्ही! परंतु मला आपले वाटते की, देवळात जावे. आणि तुम्ही देवाधर्मासमक्ष लग्न कधी लावणार? आपण असेच किती दिवस राहायचे? ते बरे नाही दिसत. लोक नावे ठेवतील. आपण लवकर लग्न लावू असे कितीदा म्हणालेत; परंतु तुम्ही मनावर का बरे घेत नाही? तो दुष्ट मनुष्य मोडता घालीत असेल. होय ना? खरेच आपण लवकर लग्न लावू या. म्हणजे सारे बरे होईल. होय म्हणा.’

« PreviousChapter ListNext »