Bookstruck

ती काळरात्र 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. तिने क्षणभर डोळे मिटले. ‘छे; प्रियकराचा हात असा नसतो. हा हात थंडगार आहे. हयात ऊब नाही. काही नाही. गार गार हात, मेलेला हात, का मारणारा हात! बघू? होय. हे पाहा रक्त तुमच्या हातावर आहे. माझ्या आईच्या प्राणांचे, भावाच्या प्राणांचे आणि त्या चिमुकल्या प्राणांचे, सर्वांचे रक्त तुमच्या हातावर. भयाण भेसूर हात. दुष्ट दुष्ट हात. हा का प्रियकराचा हात? नाही. नाही’

‘मधुरी!’

‘काय?’

‘तू अशी भ्रमिष्टासारखी काय करतेस? वेळ नाही; ऊठ माझ्याबरोबर चल. मी माधव. तू ओळखीत नाहीस? ज्याची वाट बघत असतेस तो मी.’

‘माधव?’

‘होय. ऊठ, मधुरी ऊठ. असे काय करतेस?’

‘हं, ओळखले. काल आलेत वाटतं? सर्वनाश झाल्यावर दर्शन दिलेत.’

‘अर्जुन सर्वनाश झाला नाही. मी आलो आहे वाचवायला. ऊठ, नीघ.’
‘बोलण्याची आता इच्छा नाही. सारा खेळ खलास. आता कशात राम नाही; परंतु आलेत, एका अर्थी बरे झाले. मी आता सांगते ते नीट ऐका, त्याप्रमाणे करा. नाही म्हणू नका. हे बघा, उद्या मला फाशी देतील. मी मरेन. माझे प्रेत तुम्ही मागा आणि मला अग्नी द्या. कोठे बरे द्याल? आईला दिलेला आहे तिथेच द्या. आईच्या अगदी जवळ नको. कारण मी पापी आहे; परंतू आईचा आधार असू दे. भाऊलाही तिथेच दिलेला आहे. आईच्या कडेला मला अग्नी द्या. आणखी एक सांगते गावाबाहेर ती नदी आहे ना? तिच्या तीरातीराने बघत जा. कोठे तरी लव्हाळयात सापडेल. माझे बाळ सापडेल. जन्मताच ते मी सोडून दिले. नदीच्या स्वाधीन केले. तरी सापडेल. सापडेल त्याचा सांगाडा. त्याला आणा आणि माझ्या स्तनांवर त्याला ठेवा. त्याला एकदासुध्दा नाही हो पाजले. स्तन भरून येत; परंतु बाळ कोठे होता? आणा हो त्याला शोधुन आणि माझ्या जवळ ठेवून, माझ्या स्तनाशी त्याला ठेवून, दोघांनाही एकदमच अग्नी द्या. हे काय, रडायला लागलेत वाटते? कर्म करताना हसावे, मग रडावे; परंतु डोळे पुसा, ऐका नीट. कर्तव्य कठोर असते. ते केलेच पाहिजे. कराल ना?’

‘मधुरी, असे का तू म्हणतेस? तू मरणार नाहीस. तू वाचशील. आपण दोघे एकत्र राहू. सुखात नांदू. चल ऊठ. धर हात. वेळ नाही. नीघ.’

‘नका अशी ओढू. मला मरू दे. कशाला आता जगायचे? आणि समजा तुमच्याबरोबर आले तर पुन्हा पकडतील. पुन्हा तीच शोभा. खरे ना?’

‘परंतु आपण लांब लांब जाऊ. दुसर्‍या देशात जाऊ. तेथे कोण येईल धरायला, कोण येईल पकडायला? ऊठ.’

‘दुसर्‍या देशात हया देशातील पोलीस येणार नाहीत. त्यांचा ससेमिरा चुकेल. पण....’

« PreviousChapter ListNext »