Bookstruck

पुन्हा घरी 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘चिंतेची सत्ता? चिंता, काळजी, हयांनी कधी मी त्रासला गेलो होतो?मला नाही आठवत. मी जीवनात निश्चिंतपणे वावरत आलो. ना चिंता, ना हुरहूर. छट्, तुमचीही सत्ता मी कबूल करीत नाही.’

‘काय? माझी सत्ता मान्य करीत नाहीस? अपमान करतोस माझा? असे चिंतादेवीने रागाने म्हटले. तिने ‘फू फू फू फू’ करीत माधवाच्या डोळयांत फुंकर घातली. ती निघून गेली. परंतु माधव आंधळा झाला!

माधवची बाहेरची दृष्टी गेली; परंतु अंतदृष्टी कोण नेणार? ज्ञानचक्षू कोण नष्ट करणार? तो तसाच शांतपणे खुर्चीत होता. आता समोरचा समुद्र दिसत नव्हता. त्याची घो घो गर्जना कानी येत होती. ती स्वकर्तव्याचे त्याला स्मरण करून देत होती.

‘कोणते बरे विचार माझ्या मनात मघा खेळत होते? हो, ही दलदल दूर करावी. आरोग्य निर्मावे. लोक सुखी करावे.  त्यांच्या संसारात आनंद आणावा. गावातील रोग जातील. लहान मुलांची तोंडे फुलतील. त्यांचे गाल गुबगुबीत होतील. त्यांवर गुलाबी रंग चढेल. दलदली जाऊन बागा फुलतील. बागेत गुलाब  व मानवी जीवनात गुलाब. बाहेर गुलाब फुलतील, घरात गुलाबी गालांची निरोगी मुले हसतील. आनंद, सर्वत्र आनंद पसरणे, केवढे थोर काम. हेच काम करू दे. हे काम करीत मरू दे. किती उदार व सुंदर विचार मनात आला. किती पवित्र व धन्यतम हा क्षण. हे क्षणा. किती तू सुंदर. किती पुण्यवान. जाऊ नकोस. तुला पकडू दे. तुला माझ्या जीवनात अमर करू दे. थांब.

परंतु असे शब्द माधवाच्या तोंडून बाहेर पडताच तो मरून पडला. माधवाचा आत्मा निघून गेला. कोठे गेला? सैतानाकडे का परमेश्वराकडे?

« PreviousChapter ListNext »