Bookstruck

रामराव 1

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

त्या गावाचे नाव शिवतर असे होते. फार सनातनी व सोवळे गाव. शिवतर शब्दाचा अर्थ कल्याणकारक; परंतु ज्या गावात शिवाशिवी हाच धर्म, त्या गावात कल्याण कोठून येणार? शिवतर गावात सदैव भांडणे, रोज कटकटी व मारामा-या, पोलिसांना हे गाव फार आवडे, वकिलांना फार आवडे, गावगुंडांना फार आवडे.

हा कोणाचा मोठा वाडा? हा वाडा रामरावांचा? श्रीमंत आहेत वाटते? जमीनदार आहेत वाटते? वाड्यावरून तसे वाटले, तरी रामराव फार श्रीमंत नाहीत. गरिबी आता त्यांना आली आहे, परंतु पूर्वीचा मोठा वाडा अद्याप उभा आहे. पूर्वीचे मोठे नाव अद्याप ऐकू येते.

रामरावांना एक मुलगी होती. तिचे नाव प्रेमा. प्रेमाला बरोबर घेऊन ते शेतावर जात, तिला बरोबर घेऊन फिरायला जात. प्रेमाशिवाय त्यांना चैन पडत नसे.

त्या प्रचंड वाड्यात फार माणसे नव्हती. रामराव, त्यांची पत्नी सगुणाबाई व ही मुलगी प्रेमा. एखाददुसरा गडी असे. तो प्रचंड वाडा त्यांना खायला येई. सा-या वाड्याचा केर काढणेही कठीण. मुख्य दिवाणखान्यात रामराव फारसे बसत नसत.

रामरावांना गरिबांची आस्था असे. ते दुस-याला मदत करायला सदैव तयार असत. एकदा एका शेतक-याची गाडी चिखलात फसली. रामराव जात होते. त्यांनी चिखलात उतरून गाडी वर काढायला मदत केली. त्यांचा तो स्वभावच होता.

त्यांची एक मोठी आंबराई होती; परंतु रामराव आंबे कधी विकत नसत. शेत-यांना, हरिजनांना, गोरगरिबांना ते वाटीत. गावच्या शाळेतील मुलांना वाटीत. कधी सर्व गावाला आंबरसाचे जेवण देत.

त्यांना भजनाचा नाद असे. भजन कोठेही असो, ते जायचे. त्यांना त्यात कमीपणा वाटत नसे. परमेश्वराचे नाव कोठेही ऐकावे. देवासमोर कोठेही नमावे असे ते म्हणत. त्यांनी प्रेमाला कितीतरी अभंग, गाणी शिकविली होती. प्रेमाला ते पहाटे उठवायचे व मांडीजवळ घेऊन तिला शिकवायचे. प्रेमाही गोड आवाजात म्हणायची.

Chapter ListNext »