Bookstruck

रामराव 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘प्रेमा, आपल्यावर लोक बहिष्कार घालतील.’

‘परंतु महार आपल्या बाजूला येतील.’

‘घाई करून चालणार नाही. हळुहळू सुधारणा होईल.’

‘बाबा, तुमच्या त्या विवेकानंदांच्या पत्रांत त्यांनी किती जळजळीत लिहिले आहे. विवेकानंदांना का धर्म कळत नाही? आणि गावातल्या ह्या शिष्टांना का कळतो?’

‘प्रेमा, तू लहान आहेस.’

‘मी नाही लहान. चौदा वर्षांची झाल्ये तरी का लहान?’

‘मग करून टाकू लग्न?’

‘लग्नाला अद्याप मी लहान आहे.’

‘अग. आठव्या वर्षी लग्न करावे.’

‘परंतु मोतीलाल नेहरू म्हणाले, विसाव्या वर्षी करावे.’

‘कोठे ग वाचलेस!’

‘त्यांचे भाषण झाले होते. नवाकाळात आले होते. मी नव्हते का वाचून दाखविले? आईसुद्धा होती ऐकायला. आई म्हणाली, ‘इश्श.’ माझ्या सारे लक्षात आहे.’

‘लग्नाच्या गोष्टी मुलींच्या ध्यानात राहाणारच.’

‘बाबा, माझे लग्नच करू नका. मला खूप शिकवा. मी गरिबांची सेवा करीन. डॉक्टरीण होईन. दवाखाना काढीन. आपल्या ह्या वाड्यात दवाखाना काढता येईल. गरीब आजारी लोकांना ठेवता येईल. मिशनरी बाया हजारो मैलांवरून येतात, दवाखाने घालतात आणि आम्ही आमच्या देशासाठी काहीच नये का करू?’

‘प्रेमा, सर्वांनाच ह्या गोष्टी साधत नाहीत.’

‘मला साधतील. माझ्या मनात काय काय तरी येत असते. कोणाला ते सांगू?’

‘तू येतेस ना शेतावर? चल.’

‘मी नाही येत.’

‘का?’

‘शेतावर काम करणारे महार दूर बसतात. ताई दूर व्हा, दूर व्हा, मला म्हणतात आणि तुम्हीसुद्धा मला तिकडे जाऊ नकोस असे सांगता. मला नाही असे आपडत. बिचारे काम करतात आणि पुन्हा आपले दूर.’

‘आपण फिरायला जाऊ चल. शेतावर नकोच.’

‘चला. तुमची काठी आणू? चला.’

‘प्रेमा व रामराव फिरायला गेली. सगुणाबाई देवदर्शनाला गेल्या.

« PreviousChapter ListNext »