Bookstruck

प्रेमाचे लग्न 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘वयात आलेल्या माणसाचा विश्वास धरू नये. दुथडी भरून जाणा-या नदीला नीट अडवून ठेवणेच बरे. नाही तर सर्वनाश व्हावयाचा.’

‘आई, द्या हो मला वाटेल तेथे. करा एकदा लग्न व कृतार्थ व्हा. मग पस्तावू नका म्हणजे झाले.’ असे म्हणून प्रेमा वर गच्चीत जाऊन बसली. ती खिन्न झाली होती. दु:खी झाली होती.

रामराव पुन्हा वरशोधार्थ निघाले.

एके दिवशी शंभुनानांचा मुलगा तात्या अकस्मात् रामरावांच्या घरी आला.

‘प्रेमा, आई कोठे आहे?’

‘थांबा हां, बोलावत्ये.’

प्रेमाने आईला बोलावून आणले. सगुणाबाई आल्या.

‘प्रेमाच्या आई, तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलो आहे.’

‘कोणती गोष्ट? आणि तुम्ही आमच्याकडे कशाला आलेत? तुमच्यावरही बहिष्कार पडायचा.’

‘आम्ही अद्याप गरीब झालो नाही. गरिबांवर बहिष्कार पडतात. जेथे लक्ष्मी आहे, तेथे अधर्म कसा राहील? तेथे धर्म असलाच पाहिजे. बहिष्काराची आम्हाला भीती नाही आणि तुमच्यावरचाही बहिष्कार उठण्याचा एक उपाय सांगायला मी आलो आहे; सांगू?’

‘कोणता उपाय? शक्य आहे का?’

‘शक्य आहे, सहज शक्य आहे.’

‘सांगा तर.’

‘तुमची प्रेमा मला द्या. माझे बाबा तिला सून म्हणून करून घ्यायला तयार आहेत. ते ग्रामस्थांचे मन वळवून बहिष्कारही उठवतील.’

प्रेमा तेथून निघून गेली.

‘प्रेमा, थांब; जाऊ नकोस.’

‘जाऊ दे. लग्नाच्या गोष्टी निघाल्या की ती लाजते.’

« PreviousChapter ListNext »