Bookstruck

प्रेमाचे लग्न 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘कुठे करायचे लग्न?’

‘नागपूरला घेऊ उरकून.’

रामराव नागपूरला परत आले. त्यांनी सर्व हकीगत सांगितली. प्रेमा व सगुणाबाई ह्यांना तेथेच ठेवून ते शिवतरला आले. त्यांनी आपले एक उत्कृष्ट शेत विकायला काढले; परंतु कोण घेणार शेत?

‘शेत कोणी घेऊच नका.’ सनातनी म्हणू लागले.

‘परंतु आपण न घेऊ, तर आफ्रिकेतून व्यापार करून पैसे आणणारे मुसलमान घेतील. सर्वत्र त्यांच्या जमीनी होऊ लागल्या. बहिष्कार असला म्हणून जमीन घ्यायला काय हरकत आहे?’ शंभुनाना म्हणाले.

‘बरोबर, बरोबर. शंभुनाना, ते शेत तुम्हीच घ्या. वाटेल ती किंमत पडो. घ्याच.’

मुसलमानांपेक्षा अधिक किंमत देऊन शंभुनानांनी तेशेत घेतले. पैसे घेऊन रामराव नागपूरला आले. त्यांनी पाच हजार हुंडा मोजून दिला. जावयाला पोषाख दिला. अंगठी दिली. थाटाने लग्न झाले.

प्रेमा आज सासरी जाणार होती. कोणास माहीत, सासरची माणसे कशी आहेत ती. पैशाची आशक दिसत होती. प्रेमाचा पती एखाद्या साहेबाच्या मुलासारखा दिसे. गोरागोरा लालबुंद होता; परंतु त्याची मुद्रा पाहून प्रसन्न वाटत नसे. त्याचे हसणे गोड वाटत नसे. मोकळे वाटत नसे; परंतु सगुणाबाईंना जावई फार आवडला.

‘प्रेमा, सासरी नीट राहा. तुझे दैव थोर. नवरा कसा नक्षत्रासारखा आहे. त्याला मुठीत ठेव. नव-याला मुठीत ठेवणे ही संसार सुखाचा करण्याची मुख्य किल्ली. हट्ट सोडून दे. लहानपणचे तुझे विचार सोडून दे. समजलीस ना. जप.’

प्रेमा काही बोलली नाही. तिची पाठवणी करून रामराव व सगुणाबाई परत शिवतरला गेली. एकदाचे लग्न झाले.

« PreviousChapter ListNext »