Bookstruck

पित्याची शेवटची देणगी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘माझ्या घरी आता काही नाही. लग्नाच्या वेळेस बाबांनी शेत विकले. आता काय विकणार?’

‘वाडा विका म्हणावे. उद्या ते मेले म्हणजे तेथे कोण आहे राहायला? ते मी काही एक ऐकणार नाही. माहेरी कधी जातेस बोल.’

‘मी काय सांगू?’

‘दोन दिवसांची मुदत देतो. काय ते ठरव.’

सासूही घरात छळी. गड्यासारखी तिला राबवी. जिच्यावर पतीचे प्रेम नाही, तिच्यावर इतर मंडळी तरी का लोभ करतील? प्रेमाची बाजू तेथे कोण घेणार? इतर नोकरचाकरही तिचा अपमान करीत.

एके दिवशी कपाळ दुखत होते म्हणून प्रेमा खोलीत जाऊन पडली, तर सासूने गहजब केला. नाही नाही ते सुनेला ती बोलली. इतक्यात श्रीधरही आला. आईचे बोलणे ऐकून तोही खवळला. तो प्रेमाच्या अंगावर धावून गेला. त्याने तिला बकोटी धरून ओढीत आणले.

‘कपाळ दुखते म्हणे. ह्या भिंतीवर आपटतो ये ते कपाळ, म्हणजे राहील. का देऊ डाग? खबरदार पुन्हा दिवसा निजलीस तर! रात्रीही बारा वाजेपर्यंत काम केले पाहिजे. पहाटे चारला उठले पाहिजे. तुला हंटर हवा, हंटर. चाबकाने फोडीन बघ. याद राख. माहेरी जा म्हटले, तर जात नाही. बापाची इस्टेट वाचवायला बघते; परंतु तुझी चामडी नाही वाचणार. चामडी लोळवीन. नाही तर ब-या बोलाने माहेरी जा. घेऊन ये दागिने. जाशील की नाही? बोल.’

असे म्हणून त्याने तिच्या भराभर थोबाडीत मारल्या.

‘बोल, जाशील ना माहेरी?’

‘होय. जाईन.’

‘कधी जाशील?’

‘तुम्ही सांगाल तेव्हा.’

‘मी कधीचा सांगतो आहे. सांगतो आहे की नाही?’

‘हो.’

‘मग का नाही गेलीस? मारू?’

‘उद्या जाईन.’

‘उद्या नाही. आज जा. आज चालती हो.’

« PreviousChapter ListNext »