Bookstruck

ना सासर ना माहेर 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘नाही नाही म्हणतो, परंतु बाप दरवेळेस काहीतरी करून देतोच. खूप डबोले असले पाहिजे. दत्तक वगैरे घेणार आहे की काय? काय ग, काय बोलतात तुझे बाबा?’ सासूने विचारले.

‘बाबा काही बोलत नाहीत.’

‘किती आहे घरी संपत्ती?’

‘आता घरात काही नाही..’

‘खोटे सांगतेस. माहेरी पाठवली म्हणजे पुन्हा घेऊन येशील. श्रीधरने सांगितले म्हणजे झक्कत जाशील.’

‘आता नका कोठे पाठवू. येथे ठार मारा.’

‘ठार मारून कसे चालेल? तू आमचे कोळ्याचे जाळे आहेस. कोळी जाळे टाकतो व मासा पकडतो. त्याप्रमाणे तुला टाकायचे व दागिना पकडायचा.’ असे म्हणून सासू उठून गेली.

थंडीचे दिवस आले होते. सरोजाला काहीतरी गरम करावे असे प्रेमाला वाटत होते. एके दिवशी श्रीधर घरी आला होता.

‘आपल्या सरोजाला गरम कापड आणा ना. मी शिवीन पेटी. भारी थंडी पडते. आणाल का?’ तिने विचारले.

‘मरो तुझी सरोजा. आधी पैसे दे मला, आहेत की नाहीत तुझ्याजवळ? बापाने दिलेले लपवून ठेवले असशील! नाहीतर माहेरी जा व घेऊन ये. सरोजाला कपडे पण घेऊन ये. जा उद्या माहेरी. समजलीस?’

‘नेहमी नेहमी माहेरी कशी जाऊ? बाबांनी सांगितले की, आता पुन्हा येऊ नकोस. घरात आता काही नाही. बाबा वैतागून कोठे गेले असतील. सावकारांनी सारे घेतले असेल. गावक-यांनी छळले असेल. सनातनी मंडळींचा आमच्यावर बहिष्कार होता.’

‘बहिष्कार? का?’

‘आम्ही महारांना जागा दिली म्हणून.’

‘तुम्ही का म्हारामांगांना घरात घेता? म्हणून तुझ्या बापाने इतक्या लांब आणून तुझे लग्न केले वाटते? धर्मभ्रष्टाची तू मुलगी. आमचेही घर बाटवलेस. तू चालती हो. माहेरी जाऊन काही घेऊन आलीस तर तुला घरात घेईन नाहीतर बाबांना व आईला आता सांगतो की, ही सबगोलंकार करणा-याची मुलगी आहे म्हणून.’

« PreviousChapter ListNext »