Bookstruck

मुलीचा त्याग 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रेमा मुंबई शहरात आली; परंतु ती कोठे जाणार? कोणाकडे राहाणार? ती एकटी असती तर प्रश्न निराळा होता; परंतु सरोजा होती. सुंदर गोड मुलगी! कोणाजवळ ती द्यावी? कोण तिला वाढवील, पाळील, पोशील? तिला काही समजेना. रस्त्याने ती जात होती. तिने उसाच्या गंडे-या वाटेत घेतल्या. सरोजाला चुंकायला तिने एक करवा दिला. सरोजा आनंदली. ती करवा चुंकू लागली.

हिंडत हिंडत प्रेमा राणीच्या बागेजवळ आली. ती आत शिरली. कितीतरी लोक तेथे हिरवळीवर बसले होते. कोणी झोपले होते. प्रेमाही सरोजाला जवळ घेऊन झोपली. ब-याच वेळाने ती जागी झाली. तो सरोजा कोठे होती? प्रेमा घाबरली.  ती इकडे तिकडे पाहू लागली. सरोजा, सरोजा अशा हाका मारू लागली. सरोजा दिसेना.

ती तिकडे दूर सरोजा दिसली. रांगत रांगत ती दूर गेली होती. माता एकदम धावली. तिने मुलीला उचलून घेतले. ‘कोठे चाललीस बेबी? आईजवळ राहायचे नाही वाटते? गरीब आई नकोशी झाली? कोठे ग जात होतीस? आजोबांना शोधायला? आजीला शोधायला? आजी कसे म्हणे, कशी हाक मारी? ‘बेबी सरोजा.’ खरे ना? हसली रे हसली. आजीची हात आवडते वाटते? लबाड.’ असे ती बोलत होती. तिने काहीतरी खायला घेतले. सायंकाळ आता होत आली. रात्री कोठे जायचे? ती हिंडत हिंडत पुन्हा स्टेशनवर आली. रात्रभर तेथेच बाकावर बसली.

आता पहाट झाली होती. बेबीला घेऊन ती निघाली. हिंडत हिंडत ती समुद्राकाठी आली. थंडी होती. अद्याप झुंजूंमुंजू होते. तो तेथे वाळवंटात तिला कोण दिसले? कोणीतरी तेथे बसले होते. समोर समुद्र उचंबळत होता. तो मनुष्य ध्यानस्थ होता. तो का अनंताची उपासना करीत होता?

कोण होता तो मनुष्य? ते रामराव होते. प्रेमाचे वडील होते. सरोजा खांद्याशी झोपलेली होती. तिने सरोजाला अलगद त्या ध्यानस्थ पित्याजवळ ठेवून दिले. बेबी झोपलेली होती. प्रेमा दूर जाऊन उभी राहिली. काय होते ते पाहात होती.

ध्यानस्थ माणसाने डोळे उघडले, तो समोर ती सुंदर मूर्ती. समुद्राने का ते रत्न आणून दिले? ते मोती आणून दिले? ती बाललक्ष्मी का समुद्रातून बाहेर आली होती? परंतु रामरावांनी ओळखले. आपल्या प्रेमाची ही मुलगी असे त्यांनी ओळखले. मग प्रेमा कोठे आहे? ती ह्या समुद्रात शिरली की काय? हा विचार मनात येताच रामराव घाबरून उठले. बेबी सरोजाला जवळ घेऊन ते समुद्राकडे पाहात राहिले.

« PreviousChapter ListNext »