Bookstruck

आत्याच्या घरी 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘मग होणार ना तुम्ही माझ्या?’

‘मी कळवीन.’

‘तुमचे सामानच घेऊन येते माझ्याकडे. आणू तुमचे सामान? पाठवू मोटार?’

‘घाई नको.’

‘माझ्या हृदयाचे दु:ख तुम्हाला का समजत नाही? तुम्ही मोठ्या नर्स ना? माझे दु:ख दूर करा. जर कोणी प्रेमाचे माणूस मला मिळाले नाही तर मी वेडी होईन. बंगल्यातून उडी घेईन.’

‘येईन मी.’

‘कधी?’

‘एक तारखेपासून.’

‘मला किती आनंद झाला आहे! या. माझ्या व्हा.’

प्रेमा गेली. तिने राजीनामा दिला. तिने सर्व हकीगत दवाखान्याच्या प्रमुखांस सांगितली. तिला निरोप देण्यात आला. ती रोग्यांना भेटली. रोग्यांना वाईट वाटले.

‘आम्हाला भेटायला येत जा.’ रोगी म्हणाले.

‘तुम्ही बरे होऊन घरी जाल.’ ती म्हणाली.

ती आपल्या वसतिगृहात आली. तिचे सामान फारसे नव्हतेच. ती श्रीमंत बाई मोटार घेऊन आली. प्रेमा निघाली. बंगल्यात राहायला आली.

रात्रीची वेळ होती. आज एका पलंगावर प्रेमा झोपली होती. मऊमऊ गादी होती. मऊमऊ उशी होती. पांघरायला मूल्यवान शाल होती. मच्छरदाणी होती; परंतु प्रेमाला झोप येईना. तिच्या डोळ्यांतून सारखे पाणी येत होते. सरोजा कोठे असेल? बाबा कोठे असतील? मी पलंगावर पडल्ये आहे. सरोजा जमिनीवर असेल. फटकुरावर पडली असेल. तिला पांघरायला नसेल. तिच्या अंगात नसेल. गरम कापड आणा म्हणून मागे एकदा पतीला म्हटले असता ‘मरो तुझी सरोजा’ तो कसे म्हणाला, ते सारे तिला आठवले. ती त्या गादीवरून उठली. माझी मुलगी धुळीत पडली असता मला त्या गाद्यागीर्द्यांवर लोळण्याचा काय अधिकार? ती गच्चीत गेली. तेथे एकटीच बसली. आकाशातील तारे तिच्याकडे पाहात होते. वारे तिचे अश्रू पुसू पाहात होते.

ती श्रीमंत बाई जागी झाली, तो अंथरूणावर प्रेमा नाही. कोठे आहे प्रेमा? तिने सर्वत्र पाहिले. ती गच्चीत गेली. तो तेथे प्रेमा होती.

‘येथे का अशा बसलात? हे काय रडत होता वाटते?’

‘आठवणी आल्या. चला खाली. तुम्ही कशाला वर आलात?’

‘तुम्ही आता माझ्या ना आहात? म्हणून आल्ये.’

प्रेमा पुन्हा अंथरुणावर पडली. पहाटे उठून ती समुद्रावर गेली. बाबा दिसतात का या आशेने गेली होती.

« PreviousChapter ListNext »