Bookstruck

सत्याग्रहात 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘तो बंगला माझा नाही. ती मोटार माझी नाही. ही इस्टेट माझ्या आत्याची. तिची माझी अकस्मात् गाठ पडली. मी अशीच वणवण करीत होते. मुलीचाही त्याग केला. एके दिवशी आत्या भेटली. तिने मला नेले. श्रीधर, मी चैन नाही करीत! मी दु:खी आहे. मी जमिनीवर निजते. एकदा खाते. अलंकार घालीत नाही. खादी वापरते. चरखा कातीत बसते.’

‘तू माझ्याकडे आले पाहिजे. तुझी आत्या पैसे देईल. माझीही व्यवस्था होईल.’

‘ते पैसे मडमिणीकडे जातील.’

‘जाऊ देत. ब-या बोलाने येतेस ती नाही माझ्याकडे?’

‘जोपर्यंत तू चांगला वागशील अशी माझी खात्री नाही तोपर्यंत मी येणार नाही.’

‘मी तुझ्यावर फिर्याद करतो. तू मला मुक्त केलेस, परंतु मी तिला अडकवतो. तुझ्यावर हुकूमनामा मिळवतो. कायदा तुझ्या झिंज्या ओढील व माझ्या खोलीत तुला घेऊन येईल. समजलीस? जातो मी.’

श्रीधर निघून गेला. प्रेमा तेथे त्या बाकावर बसली. ती रडू लागली. सत्याग्रहात आता उडी घ्यावीच असे तिने ठरविले. ती उठली. मोटारवाला वाट पाहात होता. ती घरी आली.

ती वकिलांकडे गेली. तिने तो बंगला, ती इस्टेट बेबी सरोजाच्या नावे केली. वर्तमानपत्रात तशी नोटीस देण्याविषयी वकिलास तिने सांगितले. बंगल्याची व्यवस्था माळ्यास सांगितली. सर्व तयारी झाली.

एके दिवशी एके ठिकाणी तिने भाषण केले. तिला अटक झाली. सहा महिन्यांची तिला शिक्षा झाली. प्रेमा तुरुंगात गेली. वर्तमानपत्रात ती बातमी आली. प्रेमाचा फोटोही आला होता.
वर्तमानपत्राचा तो अंक हातात घेऊन श्रीधर प्रेमाच्या बंगल्यावर आला. माळी म्हणाला, ‘येथे कोणी राहात नाही. बंगला बंद आहे. बाई सत्याग्रहात गेल्या आहेत.’

‘खरेच गेल्या?’

‘खरेच. छापूनसुद्धा आले.’

« PreviousChapter ListNext »