Bookstruck

स्वातंत्र्य व स्वराज्य 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नंतर बुध्ददेव त्या माणसाला म्हणाले, ''मित्रा, आता झोप; विश्रान्ती घे.'' तो मनुष्य झोपला. ''भगवान् तुम्ही त्याला धर्म शिकविण्याऐवजी खायला दिलेत, झोपायला सांगितलेत हे कसे?'' शिष्यांनी विचारले. बुध्ददेव म्हणाले, ''या माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोलले पाहिजे; तरच त्याला समजेल. उपाशी पोटी माणसाजवळ अन्नाच्या भाषेत बोला. त्याला अन्नदेव नेऊन प्रथम भेटवा.'' पोटभर लोक जेवू देत. नीट झोप घेऊ देत. मग त्यांच्याजवळ इतर गोष्टी बोलू. हिंदुस्थानातील कोटयवधी लोकांस भाकर आधी देऊ द्या. त्यांना आधी कोठला धर्म, कोठली संस्कृती? ते सारे-, 'आधी कळस मग पाया-,' असे होईल. कोटयवधी उपाशी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावयास जो उभा राहील, तो खरा धार्मिक, तो खरा हिंदू धर्माचा. तो खरा उपासक, जगन्मातेचा उपासक, परंतु स्वतंत्र झाल्याखेरीज व स्वराज्य आल्याखेरीज हे कसे जमणार?

स्वातंत्र्य म्हणजे सर्वांच्या विकासाला संधी. स्वातंत्र्य म्हणजे मुखसंपन्न होण्याचे साधन. अतःपर या देशात कोणी दुःखीकष्टी नको. सर्वांना स्वाभिमानाने जगता येवू दे. विकासाच्या आड दारिद्य येता कामा नये. ज्ञानविज्ञानाचा प्रकाश सर्वत्र जाऊ दे. स्वच्छता, आरोग्य येऊ दे. अन्याय जावू दे. उपासमार जाऊ दे. नको लाचलुचपत, नको वशिले, नको कोणी उन्मत्त. सर्वांची सरळ मान होऊ दे. सर्वांना वाव असूदे. सर्वांना अन्नवस्त्र मिळो, राहायला साधे-सुधे घरदार असो. मिरासदारी कोणाचीच नको. जमीन नसेल त्याला जमीन द्या. ते स्वतःच कसायला तयार असले म्हणजे झाले. कामगारांचे हितसंबंध आधी संरक्षले जावोत. अहिंसक रीतीने सर्वांना संघटना करण्याची मोकळीक असो. सरकारी सत्तेने कोणावर दडपण आणू नये. श्रमणार्‍यांनी आपली प्रतिष्ठा ओळखावी. मालकांनी नम्रता शिकावी. वरच्यांनी खाली यावे; खालच्यांनी वर चढावे. दोघांनी एकमेकांस भेटून रामराज्य निर्माण करावे.

स्वातंत्र्यात असें हे सारे आपणास निर्मावयाचे आहे. एक नवे युग अजमावयाचे आहे. एक नवी द्दष्टी अजमावयाची आहे. हे महान कार्य आहे. त्यासाठी सर्वांना संयम पाळायला शिकले पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. आपण एकमेकांच्या भावना ओळखावयास शिकले पाहिजे. सर्वांना सांभाळले पाहिजे. सर्वांना सन्मानिले पाहिजे. माझी जात, माझा प्रश्न, माझा प्रान्त, माझी भाषा, माझा धर्म असे सारखे म्हणणें बरे नव्हे, अखिल भारतीय द्दष्टी कधी विसरून चालणार नाही. एवढेच नव्हे तर आज भारती असूनही अतिभारती झाले पाहिजे. आपण जगाचे नागरिक एका अर्थाने झाले पाहिजे. म्हणून क्षुद्र कुंपने घालू नका. क्षुद्र घरकूल नका बांधू. विशाल द्दष्टी, व्यापक सहानुभूती याची अत्यंत आवश्यकता आहे. तरच संस्कृती फुटेल.

« PreviousChapter ListNext »