Bookstruck

जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''मी सर्व राष्ट्राचा आहे, लोकांचे भिन्न प्रवाह जोडणारा, त्यांचा संगम करणारा'' हे ध्येय ज्याच्या डोळयांसमोर असेल, तदर्थ जो रात्रंदिवस धडपडत असेल, तो भारताचा सत्पुत्र. तो भारतीय संस्कृतीचा खरा उपासक. बाकीचे केरकचरा, फोलपट होत. एखादे वेळेस वाटते, नवभारताची मुले-मुली हजारोंनी उठावीत व ऐक्याची उदात्त गाणी गात हिंडावीत. प्रचाराचा, नवविचारांचा पाऊस पडायला हवा. परंतु आहे कोणाला स्फूर्ती? ही एक मिशनरी ज्वाळा पेटविल्याशिवाय कोणतेही कार्य होणार नाही. ज्यात्यंधांच्या संघटना विषे पेरीत आहेत. हिंसक लोकांच्या संघटना आगी लावीत आहेत. माझे एक मित्र नगर जिल्ह्यात काम करतात. त्यांनी त्यांच्या तालुक्यात सहकारी पध्दतीने केवढे काम केले! जनतेचे, शेतकर्‍याचे केवढे कल्याण केले. काळया बाजाराला किती आळा बसविला! परंतु त्यांचा वाडा परवा हिंसकांनी भस्मसात केला. माझे हे मित्र हिंसक, आगलावे आणि गरळ ओकणारे धर्महीन, धर्मान्धांच्या विरुध्द प्रत्यक्ष सेवेने नि सहविचार प्रसाराने झगडत होते. त्यांच्या सेवेमुळे आपला प्रभाव पडत नाही, आपले कोणी ऐकत नाही असे पाहून दुष्टांनी आग लावून त्यांचा वाडा भस्मसात केला. बंगालमध्ये, पंजाबमध्ये अशा हजारो आगी गेल्या दोन तीन वर्षात लागल्या. परंतु व्यक्तीच्या सुखःदुखाने ऐतिहासिक मूल्ये, ऐतिहासिक घडामोडी अजमावयाच्या नसतात. स्वतःच्या वैयक्तिक जीवनाची फूटपट्टी घेऊन महान् आंदोलने योजता कामा नयेत. प्राचीनकालापासून एकीकडे आसुरी वृत्तीचे लोक व दुसर्‍या  बाजूला उदार वृत्तीचे नम्र परंतु निर्भय असे दैवी वृत्तीचे लोक, यांचा लढा चालत आला आहे. तो आजही चालू आहे. यात अनेकांच्या आहुत्या पडतील. अनेकाचे संसार रसातळाला जातील. जगन्नाथाच्या रथाखाली चिरडून घेतल्याशिवाय नवनिर्मिती कोणती?

परवा मीही हिंदी साहित्यसम्राट प्रेमचंद यांच्या पध्दतीने लिहिलेले स्मृतिरम्य चरित्र वाचीत होतो. मराठीत हे पुस्तक यायला हवे. प्रेमचंद मानवधर्माचे उपासक होते. ते हिंदु-मुस्लीम ऐक्याचे पुरस्कर्ते म्हणून त्यांनाही धर्महीन, धर्मांध लोक ''मुल्ला'' म्हणून-उपहासाने म्हणत. धुळयाच्या काही लोकांनी मला ''मुल्ला'' म्हणून संबोधिले होते. निदान एका बाबतीत तरी त्या थोर साहित्यकांशी माझे नाते जडले म्हणून मला अपार आनंद झाला.

माझा एक मारवाडी मित्र आहे, तो अमेरिकेतून शिकून आला. आता एका गिरणीत मोठा अधिकारी आहे. पाचसातशे रुपये पगार आहे. त्याच्या बहिणीचे मला पत्र आले आहे की त्याला आन्तरजातीय लग्न करावयाचे आहे. एखादी सुशिक्षित वधू पाहा. मी कोठे जाणार वधू संशोधन करीत? परंतु मला माझ्या या तरुण मित्राचे कौतुक वाटले. सार्‍या देशभर आन्तरजातीय विवाह सुरू व्हायला हवे आहेत. राष्ट्र घुसळून निघो, सारी सरमिसळ होवो. त्यातून चैतन्यमय नवभारत उभा राहील.

मीही अनेक लग्ने बघत आहे. परंतु रूढ बंधने मोडून कोणी लग्न करीत आहे का, इकडे माझे लक्ष आहे. त्याच त्या जातीतील लग्न आता पुरे असे वाटते. सरमिसळ झाल्याशिवाय भारतात सर्वगामी नवचैतन्य येणार नाही. अजून आपल्याकडे ही जात, ती जात याच कल्पना आहेत. श्रेष्ठ, काश्ष्ठपणाची बंडे आहेत. हिंदुधर्मात हे आहे असे नाही तर सर्व धर्माच्या अनुयायांतही हे प्रकार दिसतील.

« PreviousChapter ListNext »