Bookstruck

जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

घटस्फोटाचा पुष्कळसा त्रास वाटतो. अनेक जातीजमातीत घटस्फोट रूढच आहे. काही प्रतिष्ठित गणल्या गेलेल्या जातीत नाही. परंतु त्यांनी केवढी कुचंबणा होते. मला पाचदहा उदाहरणे तरी माहिती आहेत की जेथे स्त्रियांचा आत्मा गुदमरे. तेथेही त्यागाने ती राहिली. ती प्रातःस्मरणीय होय.

परंतु कायद्याने-धर्माने तरी मोकळीक द्यायला हवी. भारतीय संस्कृतीने संयम शिकवला आहे. घटस्फोटाचा येते दुरुपयोग नाही. कदाचित वासराला सारखे बांधून ठेवल्यामुळे दावे सोडताच ते मोकाट सुटते. हिंदू स्त्रियाही त्या गायीप्रमाणे बांधल्या गेल्या; त्या स्वातंत्र्य भोगायला अधिकच अधीर होतील. परंतु पुन्हा सारी परिस्थिती समतोल होईल.

घटस्फोटाच्या बिलाची चर्चा करताना अनेकांची भाषणे झाली. सर्व विवाहांचा विचार केला का? पूर्व पंजाबमध्ये नुसता बांगडयांचा जोड दिला की विवाह होतो. नाना प्रकार आहेत असे प्रतिनिधी म्हणत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ''सारा विचार केला आहे.''

महाराष्ट्र महिलांच्या स्वातंत्र्याचा भक्त. येथे मुक्ताबाई मुक्तपणे विहरली. येथे वेणाई, अक्काबाई, रामदासांच्या मठांत काम करीत. येथे श्री. रमाबाई, अहिल्याबाई, लक्ष्मीबाई झाल्या. येथे ना गोषा ना पडदा.

परंतु काही मोठया समजल्या जाणार्‍या मराठा घराण्यांतून गोषा-पडदा असतो. किती मुलींची कुचंबणा होते. एकीकडे क्रांतीच्या गप्पा मारणार्‍या लोकांतही ही गुलामगिरी आहे. त्याविरुध्द कोणी का बोलत नाही? परंतु मराठा मुलींनीच याबाबत बंड करावयास हवे. मी खानदेशांत अनेक ठिकाणी हे सांगत असे. शेकडो प्रकारची गुलामगिरी आहे. परंतु ही सामाजिक गळवे आपण झाकून ठेवती असतो. मराठा समाजात स्त्री स्वातंत्र्य जायला हवे. पुनर्विवाहाची चळवळ व्हायला हवी. स्त्रियांचा आत्मा मुक्त व्हायला हवा. क्रांतिकारक तरुणांनी हे बंड करावयास पाहिजे. मला मराठा मुलींची पत्रे आली आहेत. एक मुलगी लिहिते, ''गुरुजी, मी शिकले; पण आज पडद्यात येऊन पडले. कोणास सांगू हे दुःख? मनात निराळयाप्रकारचे सामाजिक कार्य करावे असे येते. परंतु मी सभेलाही जाऊ शकत नाही.'' मला वाईट वाटते. मार्क्सवादाच्या आम्ही गप्पा मारतो. परंतु घरीदारी हा साधा मोकळेंपणाही आम्ही न्यायला तयार नाही. मराठा मुलीतच क्रांतीची ज्वाळा पेटायला हवी. इतर जागृत भगिनींनी त्यांना या बाबतीत मदत करायला हवी. मराठा मुलामुलींनीच हे काम करावे असे मी म्हणतो याचा अर्थ मी जातीय द्दष्टीने हे सांगत नाही. अर्थात लोक गैरसमज करतील म्हणून मी भीतीने टाळता कामा नये. जोवर माझे मन शुध्द आहे तोवर मला भय कशाला? Objective condition प्रत्यक्ष परिस्थिती सांगितली. चार मराठा तरुण-तरुणी सामाजिक बंड करायला निघाली तर त्यांच्या बरोबर पाचवा मीही येईन. परंतु ही सामाजिक गुलामगिरी जायला हवी. शिकूनही गुलामगिरी जात नसेल तर शिकण्याचा फायदा काय?

« PreviousChapter ListNext »