Bookstruck

संयुक्त महाराष्ट्र, आंतरभारती व एकात्म भारत 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हिंदी संघराज्यातील कोणत्याही भागाला फुटून निघण्याचा अधिकार असता कामा नये. मग राष्ट्रच कोठे राहिले? रशियाने कागदावर फुटून जाण्याचा अधिकार ठेवला तरी त्याची लष्करी ताकद एवढी अवाढव्य आहे की, फुटून जाण्याचा भाषा कोण बोलेल? सूर्याने माझ्या भोवती फिरू नका असे म्हटले तरी ग्रह त्याच्याच भोवती बिचारे फिरत राहणार आणि रशियन संघराज्यात जितकी विभिन्न राष्ट्रके आहेत, तशी का येथे आहेत? मंगोलियांतील लोक आणि युव्रेच्नमधील लोक यांच्यातील तफावतीप्रमाणे का हिंदी प्रान्तामध्ये आहे? भारतीय संस्कृती एकरूप आहे. प्रांतीय भाषा निरनिराळया आहेत, परंतु त्या भाषांतून मिळणारे संस्कृतीचे दूध एकच आहे. साधुसंतांनी, आचार्यांनी भारतीय संस्कृती एकरूप केली आहे. कसला फुटून निघायचा अधिकार मागता?

युरोपखंडातील छोटया छोटया राष्ट्रांची दशा तर बघा. बेल्जियम, हॉलंड, नॉर्वे, फिनलंड, पोलंड-महायुध्द पेटताच त्यांचे अस्तित्व क्षणात नाहीसे होते. तुम्ही ३० कोटीचे महान् राष्ट्र आज आहात. तुम्हांलाही कोटी-दोन कोटींची छोटी छोटी राष्ट्रे बनण्याची अवदसा आठवली वाटते? संयुक्त महाराष्ट्राच्या पुरस्कर्त्यांनी निःशंक वाणीने सांगून टाकले पाहिजे की, ''फुटून निघण्याचा हक्क आम्ही मागणार नाही, एवढेच नव्हे तर तो कोणालाच असता कामा नये.'' हृदयाजवळून हातपाय अलग होऊ लागले तर तेही मरतील, आणि केवळ निरवयव हृदयही जगू शकणार नाही.

काही जबाबदार मंडळींनी फुटून निघण्याचे हे सूतोवाच एव्हापासून का सुरू केले? ते जाणतात की, उद्या मुंबई महाराष्ट्रात आली म्हणजे प्रश्न सुटण्याऐवजी गुंतागुंतीचा होणार. मुंबई महाराष्ट्राला कोणते उत्पन्न देणार बरे? येथे शेतसारा, जंगल नाही, मुंबईचे उत्पन्न प्राप्तीवरील कराचे व आयात-निर्यात जकातीचे. परंतु ही दोन्ही उत्पन्ने मध्यवर्ती सरकालाच जातात. उद्या ३० लाख वस्तीच्या मुंबईच्या कारभारासाठी आम्हांला पैसा खर्च करावा लागणार. मुंबई देणार मात्र काही नाही. पांढरा हत्ती पोसावा तसे व्हायचे. मग येथील प्रांतिक प्रतिनिधी मध्यवर्ती सरकारला म्हणतील, यातील बरेचसे उत्पन्न प्रांताला पाहिजे. मध्यवर्ती सरकार म्हणेल, ''ब्रिटिश होते त्यापेक्षाही लष्कराचा खर्च अधिक येणार. ब्रिटिशांची मुख्य लष्करी ताकद विलायतेत होती. आपणास तर सारेच येथे उभे करावे लागणार. पैसे कसे द्यावयाचे?'' असा विरोध असला तर ''तुमचे आमचे पटत नाही, आम्ही फुटून निघतो'' असे म्हणावयाचे. कम्युनिस्ट तर म्हणतील, ''फुटून स्वतंत्र व्हा व रशियन संघराज्यात सामील झाल्याचे जाहीर करा. रशियाची ताकद तुमच्या मागे मग उभी राहील.'' संयुक्त महाराष्ट्राचे काही पुरस्कर्ते कम्युनिस्टांच्या धोरणाचे आहेत, म्हणून फुटून निघण्याच्या या सुरामुळे भेसूर भविष्य डोळयापुढे उभे राहते. वेळीच सावध राहा.

ज्याप्रमाणे हिंदी संघराज्यातून फुटून जाण्याचा अधिकार असता कामा नये, त्याचप्रमाणे उपप्रांताच्या भाषेचा चावटपणाही बंद झाला पाहिजे. नागपूर ते मराठी कारवार एकजिनसी, सलग प्रांत उभा राहिला तरच शोभा. जनतेसमोर संयुक्त महाराष्ट्राच्या किंवा इतर नुसत्या डरकाळया नकोत. राणा भीमदेवी भाषणांनी जनता अंधारात राहते. जनतेला सांगा की, उपप्रांत होणार नाहीत. हिंदी संघराज्यातून फुटून निघणार नाही. हिंदुस्थानचेच आपण अवयव; आपले हृदय एक, आत्मा एक. भाषेच्या सोयीसाठी प्रेमाने अलग व्हावयाचे, परंतु हे खेळीमेळींने, सर्वाच्या सोयीनें. उपप्रातांची भाषा काढलीत की, मुंबई शहरही मग एक स्वायत्त उपप्रांत म्हणून राहील.

« PreviousChapter ListNext »