Bookstruck

संस्कृति व साहित्य 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मराठीची तुम्ही निरपेक्ष सेवा करा. आपल्या मराठीत अमुक नाही असे म्हणण्याची पाळी न येवो. रवींन्द्रनाथांनी देवाघरी जाण्याच्या आधी विश्वरचनेवर शास्त्रीय ग्रंथ लिहिला. तो महाकवी वीणा बाजूला ठेवून शास्त्र-ग्रंथ लिहायला घेतो. आमचे विज्ञानवेत्ते काय करीत होते? त्यांची अजून परिभाषा नसेल परंतु तोवर ऑक्सिजन, कार्बन असेच शब्द वापरा. भराभरा शास्त्रीय कल्पना, ज्ञान सर्वत्र न्यायचे आहे. वाट कोठवर बघायची? घेतली तीच शास्त्रीय भाषा तर काय बिघडले? जग जवळ आले आहे. तीही भाषा आपलीच समजा. पंडित जवाहरलाल एकदा म्हणाले, 'मी राजकारणात पडलो नसतो तर संक्षेपाने जगातील सारे चांगले ग्रंथ हिंदीत आणले असते.' तुम्ही मराठीत आणा. ज्याला स्वतंत्र गंगा निर्माण करता येत असेल त्याने नये अनुवाद करू; ज्यांना ते नसेल जमत त्यांनी आणावे पाट आणि मातृभाषा समृध्द करावी. तुरुंगात मला चांगले पुस्तक मिळताच मी अनुवाद करून ठेवीत असे. प्रसिध्द होईल तेव्हा होईल. मेल्यानंतर हस्तलिखिते इतिहास संशोधक मंडळाला मिळतील. माझ्या पेटीत अजून कितीतरी अनुवाद पडून आहेत. मोबदला मिळो न मिळो. करून ठेवा, ज्ञानेश्वरांनी अमृतासारख्या ओव्या कोळशाने लिहिल्या. त्यांना का कधी धनाची अपेक्षा केली? जुन्या वागीश्वरांनी निरपेक्षपणे सेवा केली. आईच्या सेवेची का आपण मजुरी मागतो? अर्थात आपणाला जगायचे असते, मिळाले काही तरी उपयोगी पडते, परंतु तेवढयासाठीच म्हणून लिहू नये, मराठीच्या प्रेमाने लिहा.

पूज्य विनोबाजी धुळे तुरुंगात एकदा म्हणाले, 'ज्या भाषेत ज्ञानेश्वरी आहे ती माझी मातृभाषा याची मला कृतार्थता वाटते. ईश्वराची ही कृपा' विनोबाजींना अनेक भाषा येतात. परंतु भक्तिप्रेमाने ते म्हणाले, 'रामायणास तुलना नाही. ज्ञानेश्वरीस तुलना नाही. आणि ती ज्ञानेश्वरी एका कुमाराने लिहिली. का लिहिली? ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा म्हणून, आणि ती ब्रह्मविद्या आबाल वृध्दांस समजावी म्हणून.'

'आबालवृध्दसुबोध' असे शब्द श्री. ज्ञानदेवांनी लिहिले. त्यांच्यासमोर सारा समाज होता. केवळ प्रतिष्ठित लोक नव्हते. विनोबांनी गीताई लिहिली. आश्रमातील मुलींना अनुवाद समजला तर पास, न समजला तर नापास, अशी अवघड कसोटी त्यांनी लावली. 'यज्ञवशिष्ट जे खाती' हा अनुवाद मुलींना अवघड गेला हे पाहताच 'यज्ञात उरले खाती' असा बदल त्यांनी केला. महाराष्ट्रात २ लाख गीताई खपली. गावोगाव ती गेली. राष्ट्रीय ग्रंथ जणू गीताई झाली आहे. परंतु कोणा साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षाला तिचा उल्लेख करावा असे वाटले नाही. जे जनतेपर्यंत जाऊन पोहोचतील ते राष्ट्रीय ग्रंथ. हरिपाठाचे अभंग हेच अजून राष्ट्रीय पुस्तक आहे? तुमची पुस्तके गेली का जनतेपर्यंत? ती जनतेसाठी आहेत का?

« PreviousChapter ListNext »