Bookstruck

संतांचा मानवधर्म 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भारतीय संतांनी केवळ भक्तीचे मळे पिकवले नाहीत, तर आपल्या उपदेशाने भारतीय मनाची मशागत करून त्यांचे चारित्र्य घडवले. 'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे' अशा संतांच्या थोर कार्यावर केलेले हे भावस्पर्शी भाष्य.....

४ जुलै ही स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी. १९०४ मध्ये स्वामी निजधामास गेले. चाळीशी संपली ना संपली तोच महापुरुष आपला दिव्य संदेश सांगून पडद्याआड गेला. विवेकानंदांचे मूळचे नाव नरेन्द्र. विवेकानंद हे नाव त्यांनी पुढे घेतले. ते लहानपणापासून विरक्त वृत्तीचे. नवीन धोतर भिकार्‍याला त्यांनी दिले. अति बुध्दिमान नि खेळकर. तालीम करायचे, कुस्ती करायचे. उत्कृष्ट गाणारे नि वाजवणारेही. तरुणांचे पुढारी असायचे. कॉलेजमध्ये सारे ग्रंथ वाचून काढले. त्या वेळेस केशवचंद्र सेन, रवीन्द्रनाथांचे वडील देवेन्द्रनाथ वगैरे प्रसिध्द धार्मिक मंडळी होती. त्यांची व्याख्याने विवेकानंद ऐकत.

त्यांनी या दोघांना, ''तुम्ही देव पाहिला आहे का?'' म्हणून विचारले. दोघांनी नकार दिला आणि याच वेळेस स्वामी रामकृष्ण परमहंसांची नि त्यांची गाठ पडली. नरेंद्राला बघताच रामकृष्णांची जणू समाधी लागली. ''तुम्ही देव पाहिला आहे?'' या प्रश्नाला, ''हो पाहिला आहे. मी तुझ्याजवळ बोलत आहे त्याहूनही अधिक आपलेपणाने मी त्याच्याजवळ बोलतो'' असे रामकृष्णांनी उत्तर दिले.

विवेकानंद आरंभी पक्के नास्तिक. ''Let Mr. God come and stand before me- तो राजश्री ईश्वर कोठे असेल तर त्याने यावे माझ्यासमोर.'' असे ते म्हणायचे, परंतु रामकृष्णांनी त्यांच्या जीवनात क्रांती केली. निराळी साधना सुरू झाली. पुढे रामकृष्ण परमहंस देवाघरी गेले. मरावयाच्या आधी ते विवेकानंदांस म्हणाले, ''माझी सारी साधना मी तुला देत आहे!'' महापुरुषाने जणू मृत्युपत्र केले! रामकृष्णांच्या साधनेला तुलना नाही. देव मिळावा म्हणून त्यांची केवढी धडपड! अहंकार जावा म्हणून भंगी बनले. स्त्री-पुरुष भेद जावा म्हणून स्त्रीचा पोशाख करून वावरले. एक दिवस गेला की देवाला रडत रडत म्हणावयाचे, ''एक दिवस गेला नि तू आला नाहीस.'' धनाची आसक्ती जावी म्हणून एका हातात माती नि एका हातात पैसे घेत नि म्हणत, ''हीही मातीच आहे.'' नि गंगेत फेकीत. अशी ही अदभूत साधना! अनेक वर्षांची. परमेश्वराचा साक्षात्कार सर्व धर्माच्याद्वारा त्यांनी करून घेतला. मशिदीतही त्यांना प्रभू भेटला. चर्चमध्येही भेटला. सर्वधर्मसमन्वय त्यांनी केला. सर्व धर्म सत्य आहेत, ईश्वराकडे नेणारे आहेत असे त्यांनी अनभवून सांगितले.

श्री रामकृष्ण परमहंस यांचा जन्म ही एक ऐतिहासिक आवश्यकता होती. सारे जग जवळ येत होते. अशा वेळेस सर्व धर्माचे ऐक्य शिकविणारा महापुरुष हवा होता. भारताला आणि जगाला अशा पुरुषाची जरुरी होती. भारतातही नाना धर्म. जोपर्यंत भारत विविधतेतील एकता ओळखून तदनुरुप वागणार नाही तोवर त्याचे नष्टचर्य संपणार नाही. स्वतः हे अनुभवून भारताने जगाला शिकवायचे आहे. भारताचे हे ईश्वरी कार्य आहे. श्री रामकृष्णांनी तो संदेश दिला. विवेकानंदांनी तो अनुभविला, शिकविला. गांधीजींनी त्याचा आणखी विस्तार केला. ते कार्य आणखी पुढे नेले.

« PreviousChapter ListNext »