Bookstruck

संतांचा मानवधर्म 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पूर्वज फरक करणारे, बदल करणारे होते. स्वतंत्र बुध्दी वापरणारे होते. एकदा एक शास्त्री म्हणाले, ''गीतेत तस्मात् शास्त्र प्रमाणं ते'' असे म्हणले आहे. शास्त्राने सांगितल्यामुळे आम्ही अस्पृश्यता मानतो. दुष्टपणामुळे नव्हे.'' परंतु मी त्यांना म्हटले, 'भगवान् जे शास्त्र प्रमाण सांगत आहेत ते तुमचे शिवाशिवीचे शास्त्र नव्हे. ते म्हणतात, 'मया प्रोत्तंच् शास्त्रम्, मी जे शास्त्र तुला सांगितले ते प्रमाण मान. ते तर सारे बुरसटलेले धर्म झुगारून द्यायला सांगत होते.'

''सोडून सगळे धर्म शरण ये मज- सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज,'' असे ते म्हणत आहेत. ते वेदवादांचे धर्म त्यांना नको होते. श्रेष्ठ, कनिष्ठपणाचे धर्म त्यांना नको होते. समाजाच्या सेवेचे कोणतेही कर्म करणारा मुक्त आहे अशी त्यांची ही महान शिकवण आहे. ''स्वकर्म कुसुमीं त्यास पुजूनी मोक्ष मेळवी.'' सेवेचे कोणतेही कर्म म्हणजे प्रभूची पूजा. श्रीकृष्णाच्या काळी ब्राह्मण क्षत्रियांना वरचे स्थान होते. स्त्रियांना कमी मानू लागले होते. श्रीकृष्ण म्हणतात,

'स्त्रियो वेश्यास्तथा शूद्रस्तेऽपियान्ति परांगतिम्.'

शेतकरी, कामकरी, सर्वांना ते जवळ घेत आहेत. सेवेची जी जी कर्मे आपण कमी मानू लागलो ती ती भगवंतांनी स्वतः केली. राजसूय यज्ञाच्या वेळी धर्मराजा श्रीकृष्णास म्हणाला, ''देवा, तू कोणते काम करशील? येणार्‍या थोरामोठयाचे स्वागत करशील?'' श्रीकृष्ण म्हणाला, ''नको, मी एक काम करीन. हजारो लोक जेवून उठतील तेथे मी शेण लावीन.'' पुरुष जेवून ओटीवर विडा चघळीत बसतात. बायका शेण लावतात म्हणू का त्या तुच्छ? तर मग तेच काम मी करतो. आणि ते कर्म पवित्र आहे. थोर आहे असे जगाला दाखवतो असे श्रीकृष्ण मनात म्हणाले असतील. गायी गुराख्यारोबर ते जेवले, त्यांनी घोडे हाकले, त्यांचे खरारे केले, त्यांनी उष्टी काढून शेण स्वतः लावले. महापुरुष सेवेची जी जी कर्मे पवित्र आहेत ती कर्मे स्वतः करून सिध्द करतात. आपल्या महाराष्ट्राचे महर्षि सेनापती बापट आहेत. त्यांचे दिव्य जीवन तुम्हांला माहीत आहे?

समाजाची सेवा करणार्‍या सर्वांना ॠषी उचंबळून प्रणाम करीत आहे. रूद्रसूक्तात ॠषी म्हणतो, 'कुंभारा तुला प्रणाम; सुतारा तुला प्रणाम; चांभारा तुला प्रणाम.' मी लाहनपणी हे मंत्र शिकलो. मोठेपणी अर्थ कळू लागला. मी सुटीत गांवी जाऊन शंकराच्या देवळात बसत असे. वेद शिकवणारे भटजी 'चर्माकरेम्यो नमो'- चांभारा तुला प्रणाम असे म्हणत. शंकरावर अभिषेक करीत असत. मी त्यांना म्हणे, ''तुम्ही चांभाराला प्रणाम करीत आहात. पंडया चांभाराला आणू का मंदिरात?'' ते रागावत. म्हणत, ''तुला शिंगे फुटली.'' मी म्हणे, ''तुम्ही म्हणता त्याचा असा अर्थ आहे.'' अर्थरूप होणे म्हणजे धर्म.

बंधूंनो, आणपण मोठमोठी तत्वे बडबडतो, परंतु कृती मात्र उफराटी असते. ओठावरचा घास पोटात गेला नाही तर शरीर धष्टपुष्ट होईल का? त्याप्रमाणे जी तत्वे आपण बडबडत ती कृतीत न आणू, जीवनात न आणू तर समाज समृध्द होईल का? भगवान श्रीकृष्णाच्या या भूमीत आज सर्वत्र दुःख, दैन्य, दास्य आहे. त्यांच्या गोकुळात तर अपार आनंद होता.

« PreviousChapter ListNext »