Bookstruck

संतांचा मानवधर्म 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

विवेकानंदांहून गेल्या शतकात हिंदू धर्माचा थोर उपासक दुसरा कोण असेल? अमेरिकेत त्यांनी हिंदुधर्माचा विजयध्वज फडकावला. तो इतिहास वाचून आमच्या आंगावर मूठभर मांस चढते, परंतु तुमची शिवाशिवी का त्यांनी जगासमोर मांडली?

तुमच्या धर्मातील उदात्त तत्त्वे त्यांनी दुनियेसमोर ठेवली. हिंदुधर्मातील दिव्यता जगासमोर सांगणारे विवेकानंद हिंदुधर्मातील अनुदारता पाहून एके दिवशी रडले. मित्रांनी विचारले, ''स्वामीजी का रडता?'' ते म्हणाले, ''हिंदु लोकांनी आपल्याच बंधूंना पशूच्या स्थितीत नेऊन ठेवले आहे. त्या पार्थसारथीच्या या देशात केवढे हे पाप? या लोकांना मी कसे वर आणू म्हणून मी रडत आहे.''

बंधूनो, विवेकानंदांची ही वेदना तुम्हांला कळते का? रामतीर्थ एकदा म्हणाले, 'आमच्या धर्माला शिवू नको हे नांव द्यावे.' या रामतीर्थाच्या उदगारातील तीव्र दुःख तुम्हांला कळते का?

वाईच्या प्राज्ञपाठशाळेतील थोर आचार्य नारायणशास्त्री मराठे. आज त्यांनी केवलानंद नांव घेतलेले आहे. थोर ब्रह्मचारी विनोबाजी त्यांच्या पायाजवळ शिकले. माझा एक मित्र बाबा फाटक त्यांच्याजवळ शिकत होता. तो त्यांना म्हणाला, ''देव मिळावा म्हणून हिमालयात जावे असे वाटते'' ते म्हणाले, ''हरिजनांची सेवा कर. त्यांच्या मुलांची ढुंगणे धू. तुला देव भेटेल.''

त्यांना का धर्म कळत नाही? धर्मासाठी, राष्ट्रासाठी, त्यांना निदिध्यास. १९३१ मध्ये वाटोळया परिषदेच्या वेळी लंडनमध्ये आमच्या पुढार्‍याचे आपसांत जमेना. जगासमोर या देशाचे धिंडवडे होत होते. एके दिवशी नारायणशास्त्री जेवताना रडत होते. मुलांनी विचारले, ''आचार्य, अश्रू का?'' ते म्हणाले, ''भारताचे लंडन येथे चाललेले धिंडवडे वाचून डोळे भरून येतात. सुचत नाही.''

अशा नारायणशास्त्र्यांना का धर्म कळत नाही? आणि महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री म. म. काणे सांगतात की अस्पृश्यता दूर करा.

श्री. तुकडोजी महाराज म्हणाले, ''हरिजनांना मंदिर उघडेपर्यंत मी मंदिरात जाणार नाही.'' अरे, तुम्हाला कोण धर्म शिकवणार? महात्माजींहून सत्याचा पुजारी कोणता आणायचा? त्यांचे श्वासोच्छास म्हणजे वेद. त्यांचे बोलणे-चालणे म्हणजे शास्त्र; म्हणजे गीता. थोर महात्मे तुम्हाला हरिजनांना जवळ घ्या सांगत आहेत. आता अंत पाहू नका. अंत बघाल तर तुमचा अंत होईल.

तो थोर चोखोबा. देवाच्या देर्शनासाठी तळमळणारा. ध्यानी-मनी त्याला देव दिसतो. त्याला स्वप्न पडते. विठाई माऊलीने आपल्याला जवळ घेतले आहे. प्रभु आपल्या गळयातील तुळशीचा हार आपल्या गळयात घालीत आहे असे त्याला दिसते. सासरहून मुलगी माहेरी यावी. आईने तिला जवळ घेऊन स्वतःच्या गळयातील हार तिच्या गळयात घालावा, तसे चोखोबाला दिसते. ''माझ्या देवाने हार घातला,'' असे आनंदाने मस्त होऊन तो सांगत सुटतो. बडवे त्याला मारतात. त्या चोखोबाची वेदना कोण जाणणार?

''ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
काय भुललासि वरलिया अंगा''



« PreviousChapter ListNext »