Bookstruck

संतांचा मानवधर्म 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक शास्त्री म्हणाले, ''अहो गुरुजी, सर्वत्र एक ब्रह्म आहे, एक आत्मा आहे हे खरे असले तरी सर्वत्र भेद आहेत. या शरीरात पाहा. उजवा हात पवित्र. डावा हात अपवित्र. तसेच समाजांत.'' मी त्यांना म्हटले, ''डावा हात अपवित्र म्हणून का कापून फेकून दिलात? डावा हात सकाळी गम्मत करतो, परंतु माती लावून धुतला की झाले. त्या हातावर राखुंडी घेऊन दात घासता, त्या हातावर चुन्याचे बोट फासून तंबाखू चोळता. त्या हातानेंच जेवताना पाणी पिता. डावा हात दुखु लागला तर उजवा हात धावतो. डाव्या हाताला दुःख झाले तर दूरचे वरचे डोळे रडू लागला तर उजवा हात धावतो. डाव्या हाताला दुःख झाले तर दूरचे वरचे डोळे रडू लागतात. सर्व शरीरात एक प्राण आहे. एका नाडीचे ठोके पडत आहेत. राष्ट्रातील सर्व जातिप्रजाती म्हणजे राष्ट्रपुरुषाचे अवयव. सर्वांमध्ये एक प्राण हवा. एक नाडी हवी. हरिजनांना पाणी मिळत नसेल तर तुमचे डोळे ओले व्हायला हवेत. हरिजनांना घरे नसतील तर तुमच्या हृदयाला घरे पडायला हवीत. उगीच काही तरी बोलू नका. धर्माची टिंगल नका करू. व्यर्थ कोटया करून लोकांना झुलवू नका, फसवू नका. तुमचा होतो खेळ, राष्ट्राचा जातो प्राण. तुम्ही हसाल परंतु तुमच्या धर्माचेही हसे होते.''

बंधूंनो, जगाला जवळ घ्याल तर देव तुमच्याजवळ येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

''येथ विद्वत्त पऱ्हां सांडिजे । तेथ व्युत्पुत्ती आवघी विसरिजे ॥
जे जगा धाकुटे होई जे । ते जवळीक माझी''


तुमचे विद्वत्त्व; तुमचे पांडित्य विसरून जगाजवळ जा. सार्‍या  जगासमोर नम्र व्हाल तर देव तुमच्याजवळ आहे.

तुकाराम महाराज म्हणतात,

नम्र झाला भूतां । तो विश्वंभराला हृदयात कोंडून ठेवील.

ज्ञानेश्वर म्हणतात,

तै झडझडून राहिला निघ । इथे भक्तीचिये वाटे लाग ॥
तै पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥


ही सारी क्षुद्र जळमटे दूर करा. खरा धर्म हृदयात येऊ दे. मानवावर, प्राणिमात्रावर प्रेम म्हणजेच भक्ति. ''पादोऽस्य विश्वा भूतानि'' हे सारे प्राणी म्हणजे भूतमात्रांवर प्रेम. तसे कराल ते ते अव्यंग निजधाम मिळेल. सर्वाचे संसार सुखी करणारे स्वराज्य तेव्हाच मिळेल. ऐहिक मोक्ष वा पारलौकिक मोक्ष सर्वांवर प्रेम करण्यानेच लाभेल असे संत पुन्हा पुन्हा सांगतात. परंतु ऐकतो कोण?

तुकाराम महाराज म्हणतात,

बोलणे फोल झाले । डोलणे वाया गेले ॥

« PreviousChapter ListNext »