Bookstruck

संतांचा मानवधर्म 18

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

संसार सोडून नको जायला. संसारच सुखाचा करायचा आहे. उद्योगधंदे करा, संपत्तिही मिळवा परंतु संचय नको.

जोडोनिया धन उत्तम व्यवहारें
उदास विचारें व्यय करी

असे ते सांगतात. पैसा मिळवा परंतु उत्तम व्यवहाराने मिळवा. काळयाबाजाराने नको मिळवू. अरे समोरची जनता म्हणजेच देव. या देवाची वंचना करून कोणता देव मिळणार? तुकाराम पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त.

तुझ्या नामाची आवडी
आम्ही विठो तुझी वेडी


असे ते म्हणतात. राजस सुन्दर मदनाचा पुतळा असे त्या मूर्तीचे वर्णन करतात. परंतु ते मूर्तीच्या पलिकडे जाणारे. मूर्तीची पूजा करून सर्व मानवात, चराचरात ती पाहायला शिकायचे. नुसती देवाला फुले वाहून काय उपयोग?

तीर्थी धोंडा पाणी
देव रोकडा सज्जनीं
प्रत्यक्ष देव जेथे सदाचार आहे तेथे आहे.
दया, क्षमा, शान्ति, तेथे देवाची वसती

असे ते म्हणतात.

जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा


असे ते म्हणतात, अशी त्यांची शेकडो वचने आहेत. तुम्हाला देव मिळाला असेल तर तुमचे जीवन उदार होऊ दे. तुमचे वर्तन ही कसोटी.

भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव.


जमीन चांगली की वाईट ते तिच्यातून अंकुर वर कसा येतो त्यावरून ठरवावयाचे. मनुष्य कसा वागतो यावरून त्याची धार्मिकता जाणायची.

ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकारामादि संतांनी पंढरपूरची वारी सुरू केली. सार्‍या महाराष्ट्रातून तेथे स्त्री-पुरुष येऊ लागले. एकप्रकारची एकता, मानवता फुलू लागली. तुकाराम महाराज पंढरपूरच्या वाळवंटातील सोहळयाचे वर्णन करताना उचंबळून म्हणतात,

कठोर हृदये मृदु नवनीते
पाषणां पाझर फुटती रे
एकमेकां लोटांगणी येती रे ॥

हा त्याला नमस्कार करीत आहे, तो याला करीत आहे. कठोरता गेली. हृदये प्रेमळ बनली. पाषणांसही पाझर फुटतील. संतांनी महाराष्ट्रात एक तरी जागा अशी निर्माण केली की, जेथे सारे समान म्हणून वागतील. परंतु शेवटी पंढरपूर आपण जेथे असू तेथे हवे. एकनाथांनी म्हटले,

काया हे पंढरी आत्मा हा विठ्ठल

« PreviousChapter ListNext »