Bookstruck

निसर्ग 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महान फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्यूगोने म्हटले आहे, 'आकाशातील तारा-बाग सदैव घवघवीत आहे, ती नित्य नवीन आहे.'

पश्य देवस्य काव्यं
न ममार न जियति


हे देवाचे काव्य आहे, ते अजरामर असे आहे. तुला सृष्टीचे काव्य वाचण्याची गोडी लागो.

झर्‍यातून पुस्तके आहेत. पाषणांतून प्रवचने आहेत, परंतु पाह्यला डोळे हवेत. ऐकायला कान हवेत. आणि सायंकाळी परत येत होतो. खाडीतून यायचे होते, भरती लागली होती. द्वादशी होती. रात्री ९ ला पुरी भरती व्हायची नदीच्या पाण्याला समुद्राचे पाणी जोराने भेटायला येत होते. पडाव उसळत होता. समुद्र नदीचा प्रेमबंध तोडून दूर जातो, परंतु पुन्हा प्रेमाने मागे येतो. सारखी बिचार्‍याची ओढाताण. सायंकाळ झाली. सूर्यास्तांचे रंग हळूहळू मंद झाले. अंधाराच्या छाया पसरू लागल्या. गंभीर होते ते दृश्य. दूर काळा किनारा सर्पाप्रमाणे दिसत होता. आकाशात शुक्र दिसू लागला. हळूहळू मृग नक्षत्र व खाली व्याध दिसू लागला. आकाशाची बाग गजबजली. कृष्णपक्ष होता. तार्‍यांना स्वातंत्र्य होते. तिकडे राजबाग पक्षी मधून उडताना दिसत. हंसांचा जसा राजहंस प्रकार तसा बगळयांचा हा राजबाग प्रकार आहे आणि शीळ घालणारे ते बारके पक्षीही मधून दिसत होते. त्यांना कोणी कागला म्हणतात.

समुद्राकडे पाहण्याचा मला कधी कंटाळा येत नाही. सृष्टीतील महाकाव्य म्हणजे हा समुद्र. कन्याकुमारीजवळ अनेक समुद्र एकत्र मिळताना दिसतात. नद्यांचे संगम आपण कल्पू शकतो. हा तर सागरांचा संगम आणि पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी तेथे पूर्वेच्या बाजूला चंद्र वर येताना दिसतो, तर पश्चिमेकडे, सूर्य मावळताना दिसतो. जणू विराट विश्वंभर सायंकाळी दोन हातात दोन चेंडू घेऊन खेळत आहे. आकाशातील गंमत बघत जा. सूर्योदय, सूर्यास्त, रात्रीचे तारे-सारे बघावे. कधी पहाटे उठावे व हळूहळू तारे कसे दिसेनासे होतात ही मौज पहावी. जणू एकेक पडद्याआड जात असतात. मराठीतील मुक्तेश्वर थोर कवी. तो म्हणतो, आकाशातील तारे म्हणजे जणू मोती. सकाळी पुढे येणारा अरुण हा जणू हंस. या हंसाने का ती मोती एकेक गिळली? हंस मोत्याची फराळ करतात अशी कल्पना आहे. मोरोपंत म्हणतात,

सागरतीरी तेथे
आले दैव कदाचित मराळ
जे मुक्ताफळ भक्षुनी
करीती बिसतंतु सेवूनि फराळ


हंस मोती खातात. कमलतंतू खाऊन फराळ करतात, असे या आर्येत वर्णन आहे.

दिवसा आपण फुले फुलवावी. रात्री आकाशाच्या बागेतील देवाची फुलबाग बघावी.

« PreviousChapter ListNext »