Bookstruck

मृत्यूचे काव्य 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

: तीन :
३ जून १९५०


मी बगाराम आला असता दूर आहे तोच बरा. मित्रांना सर्वस्व द्यावे असे मला वाटते, परंतु आज मजजवळ काय आहे? आणि त्यांच्या कार्यातही मी मदत करू शकत नाही. माझा पिंड राजकीय नाही. मला संघटना करता येत नाही. चर्चा करता येत नाही. मित्र माझ्यापासून या अपेक्षा करतात. मला त्या पुर्‍या  करता येत नाहीत. आपणाला मित्रांच्या अपेक्षा पुर्‍या करता येऊ नयेत यासारखे दुःख नाही. म्हणून सर्वांपासून दूर जावे असे मला कधी वाटते. मला शेकडो प्रेमळ सखे असूनही मनात एकटे वाटते व माझे डोळे भरून येतात. हे लिहितानाही अश्रू येत आहेत. किती वेळ मी लिहित आहे. बाहेर वारा सूं सूं करीत आहे. झिम झिम पाऊस आहे. मलाही थोडे गारगार वाटत आहे. पांघरुण घेऊन पडू का? किती वाजले असतील? पहाट झाली असावी. परंतु कोंबडा आरवलेला ऐकला नाही! कोंबडयाचे घडयाळ हजारो वर्षांचे आहे. पाणिनीनेही या घडयाळाचा उल्लेख केला आहे.

: चार :
१० जून १९५०


गदगला त्या दिवशी रात्री थोडा पाऊस आला. सारी झोपली होती. पाऊस आला म्हणजे माझे मन नाचते. उचंबळते. पावसातून फिरायला जावे असे मला नेहमी वाटते. बाहेरच्या झाडावर टपूटपू आवाज होत होता. कोकणात आपल्या घराजवळ केळीची झाडे असायची. केळीच्या पानांवर पावसाचे थेंब कसे वाजतात, नाही? मी खिडकीतून बाहेर हात घातला. पावसाचे थेंब हातावर पडले. मी तो ओला हात तोंडावरून फिरवला. परंतु हा क्षणिक पाऊस. खरा पावसाळा अजून नाही सुरू झाला. होईल लवकरच. ढग दोन आले होते, रिते होऊन ओलावा देऊन गेले. ते जाताच पुन्हा चंद्र दिसू लागला. मी खिडकीतून त्याच्याकडे बघत होतो. निळया आकाशातून तो हसत होता. चंद्र म्हणजे विश्वंभराचे मुके भावगीत आहे! खिडकीतून मध्यरात्री माझ्यासारखा कोणी वेडापीर त्याच्याकडे बघत असेल का?

जुन्या आठवणी गंमतीच्या वाटतात. आज दादा नाहीत, वैनी नाही, परंतु या स्मृती आहेत. चैत्र-वैशाखाचे दिवस आले! असे चांदणे पाहिले  की त्या स्मृती पुन्हा जागृत व्हावयाच्यांच, नाही? जीवनात दुःखे आहेत, सुखे आहेत. परंतु सुखावर, आनंदावर दृष्टी ठेवून आशेने माणसाने वागावे. फुले, फले, पक्षी, आकाश, तारे, रवि, शशी, नद्या, सागर, वने, उपवने, मित्र, सखे-सोयरे या आनंदाच्या राशी आपल्या सभोवती आहेत. सायंकाळी हल्ली किती मस्त देखावा दिसतो! ढगांचे शतआकार दिसतात! क्षणात हत्ती तर क्षणात धावणारे ससे! क्षणात खादीचे पोशाख केलेले ढेरपोटये व्यापारी, तर दुसर्‍या क्षणी भरजरी पोशाख केलेले विश्वेश्वराचे भालदार चोपदार! अनंत रंगांची अनंत मिश्रणे ! जणू विराट नाटक चाललेले असते. किती अंक, किती प्रवेश! आणि शेवटी सारे रंग लोपतात! गंभीर अंधार येऊ लागतो! शेवटचा काळा पडदा पडतो! रवीन्द्रनाथांना सायंकाळच्या कृष्णछाया नेहमी मृत्यूचे स्मरण करून द्यावयाच्या जणू रोज सायंकाळी आपण आपलेच नव्हे तर सार्‍या समाजाचे, जगाचे थोडक्यात रूपकात्मक नाटक बघत असतो!

सुधा, मी तुला जवळजवळ गेले वर्षभर दर आठवडयास पत्र लिहीत आहे. परंतु आता हे शेवटचे साप्ताहिक पत्र. आता मी तुला केव्हा तरी अधूनमधून लिहीन. परंतु आता बंधन नको.

« PreviousChapter ListNext »