Bookstruck

आपले नेहरू 1

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

आपले नेहरू

राजानें कालव्यांसाठीं जमीन दिली म्हणून यांना नेहरू नांव पडलें. नहर म्हणजे कालवा. नहरूचें नेहरू झालें. मूळचें आडनांव कौल होतें. पुढें वाडवडील काश्मीर सोडून आग्र्याकडे आले. आणि पहिल्या नंबरानें वकिलीची परीक्षा पास झालेले मोतीलाल अलाहाबादला जाऊन वकिली करूं लागले. झपाट्यानें पुढें आले. अपार पैसा मिळूं लागला. १८८९ मधील १४ नोव्हेंबर ही तारीख. त्या दिवशीं माता स्वरूपराणी बाळंत झाली. बाळ जवाहर जन्मला. आई जशी लाखांत सुंदर, तसाच हा बाळ सुंदर होता. हुबेहूब आईची प्रतिमा. नांव जवाहरलाल ठेवण्यांत आलें. सुंदर नांव. आणि आज तें सार्थ झालें आहे. भारताचे ते वैभव आहेत, भारताची ते खरी संपत्ति आहेत. घरांत आप्तेष्टांची मुलेंबाळें होतीं, त्यांच्यामध्यें बाळ वाढूं लागला, हंसू खेळूं लागला. घरांत मावशी होती-जवाहरलालजींच्या आईची वडील बहीण. बाळपणींच ती विधवा झालेली. धाकट्या बहिणीला तिनेंच वाढविलें. तिचा संसार थाटण्यासाठी तिच्याकडे ती येऊन राहिली होती. या मावशीला बिबिअम्मा म्हणून म्हणत. तीच भाच्याला खेळवायची.

हा गोरागोमटा बाळ मोठा होऊं लागला. नक्षत्रासारखा सुंदर, नागाच्या पिलाप्रमाणें तल्लख, हरणाप्रमाणें चपळ, पांखराप्रमाणें आनंदी असा हा मुलगा होता. घोड्यावर बसायला शिकला, पोहण्यांत पटाईत झाला. नाना खेळ खेळे. रामलीला बघायला जाई. वडिलांचे पंतोजी मुन्शी मुबारकअल्ली यांच्याजवळ बसून गोष्टी ऐके. मनांतलें सारें तो मुन्शीजींजवळ सांगायचा ; ईद वगैरे सणावारीं मुन्शीजी बर्फी, मेवामिठाई त्याला पाठवायचे.

मार बसला

परंतु वडिलांच्या हातचा जवाहरला एकदां असा म्हणतां खाऊ मिळाला कीं, त्याची गोड आठवण सदैव राहिली. लहान मुलांना सार्‍याचा सोस. त्यांना हें हवें, तें हवें. वडिलांच्या टेबलावर दोन झरण्या (फाउन्टनपेन्स) होत्या. त्यांतील एक बाळ जवाहरनें घेतलें. पुढें मोतीलाल शोधूं लागले. झरणी सांपडेना. पित्यानें कठोरपणें पुत्राला हांक मारली. झरणी घेतलीस का, म्हणून विचारलें. घाबरलेला बाळ ‘ नाहीं ’ म्हणाला. मोतीलाल लाल झाले. संतापानें त्यांनीं पुन्हा विचारलें नि जवाहरनें कबूल केलें. मग काय विचारतां ? वेताची छडी घेऊन ते मुलाला मारीत सुटले. माता रडत उभी होती. शेवटीं तिनें त्याची मुक्तता केली. आई बाळाला घेऊन गेली. तिनें अमृताच्या हातानें मलम लावलें. अंगावर जाड वळ उठले होते. पित्याच्या मारण्यांतहि अमृतच होतें. तें मारणेंही तारणेंच होतें.

Chapter ListNext »