Bookstruck

आपले नेहरू 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

घटनेच्या कामांत

देशांत आल्याबरोबर त्यांनीं घटनेच्या कामांत पुन्हां लक्ष घातलें. त्यावेळीं आपल्या देशाची घटना जवळजवळ पुरी होत आली होती. ६ डिसेंबर १९४६ रोजीं घटना तयार करण्यास सुरुवात झाली होती. घटनेचा मूलभूत व मार्गदर्शक ठराव नेहरूंनींच मांडला होता. त्या ठरावाप्रमाणें घटना तयार करण्याचें काम वेगानें चालू होतें. २६ नोव्हेंबर १९४९ ला तें महान् कार्य पूर्ण झालें. १९५० च्या प्रजासत्ताकदिनीं म्हणजे २६ जानेवारीला लोकशाही घटना देशभर लागू झाली.

या नव्या घटनेप्रमाणें १९५१ मध्यें सबंध भारतभर प्रौढ मतदान पद्धतीनें निवडणुका झाल्या. नेहरूंच्या पुण्यप्रतापानें काँग्रेस सर्व प्रांतात यशस्वी झालीं. सर्व प्रांतात काँग्रेसचीं मंत्रिमंडळे स्थापन झालीं. केंद्रीय सरकारांत नेहरू पंतप्रधान झाले.

नवरचना

यानंतर नेहरूंनी पंचवार्षिक योजनेच्या कामांत स्वत: लक्ष घातलें. या योजनेच्या कामासाठीं देशभर ते गेले. सिंद्रीचा खताचा कारखाना, चित्तरंजनचा रेल्वे इंजिनांचा कारखाना, विझगापट्टमची जहाजें बांधण्याची प्रचंड गोदी हीं सर्व ठिकाणें त्यांनीं निवडलीं. या ठिकाणांना ते नव्या भारताचीं तीर्थस्थानें म्हणतात. भारतीय तरुणांनीं अशा ठिकाणीं जाऊन आपल्या देशांत चाललेली प्रगति प्रत्यक्ष पहावी असा त्यांचा सतत आग्रह असतो. भाकरा-नांगल, दामोदर, तुंगभद्रा या धरणांचें कामहि त्यांनीं अनेकदां प्रत्यक्ष जाऊन पाहिलें आहे. ते नेहमीं म्हणतात : “आपण देशांत ज्या गोष्टी करूं त्या उत्तमच असल्या पाहिजेत असा माझा आग्रह आहे. दुसर्‍या, तिसर्‍या दर्जाचें हलकें काम आपण करतां कामा नये.” असंख्य लोकांना काम देणार्‍या या योजना भारताच्या भाग्यरेखा उजळीत आहेत.

एका खांबावरची द्वारका


१९५१, १९५३ व १९५४ या वर्षीं नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष होते. पंतप्रधानकी आणि काँग्रेसचें अध्यक्षपद या दोन अति मोठ्या जबाबदार्‍या. नेहरू म्हणूनच इतकें काम पेलूं शकले. परंन्तु दिवसेंदिवस त्यांना वांटू लागलें कीं आपण नवीन तरुण माणसांना तयार केलें पाहिजे. आपल्याला कितीहि उत्साह असला, उमेद असली तरी देशाच्या दृष्टीनें एकाच माणसावर अनेक कामें नकोत. एका खांबावरची द्वारका नको.

« PreviousChapter ListNext »