Bookstruck

आपले नेहरू 17

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

थोरांविषयीं पूज्यभाव

गांधीजींविषयीं त्यांना जे वाटतें तें शब्दातीत आहे. राजघाटावर जातात, तेथें बसून सूत कांततात. नेहरू अति बारीक कांततात. आणि गुरदेव रवींद्रनाथांविषयीं त्यांना असाच अत्यन्त आदर. मदनमोहन मालवीयांना भेटायला गेले. मालवीयांचे डोळे भरून आले. नेहरू म्हणाले : “रोनेका समय नहीं, खुशीकां है.” सुभाषबाबूंना राजीनामा द्यावा लागला तेव्हां नेहरू अति दु:खी झाले. खासगी बोलतांना म्हणाले : “ पृथ्वी दुभंग होऊन मला तिनें पोटात घ्यावें असें वाटलें.” नेताजी आज नाहींत. जवाहरलालनीं जयहिंद शब्द उचलला. भाषणाच्या शेवटीं जयहिंद म्हणतात. आझादसेनेच्या अधिकार्‍यांच्या बचावसमितींत त्यांनींहि आपलें नांव घातलें व बॅरिस्टरीचा झगा घालून लाल किल्ल्यांत बसले. असे पंडितजी आहेत. मोठेपणाला प्रणाम करणारे.

थोर ग्रंथकार

ते इंग्रजी अति सुंदर लिहितात. आत्मचरित्र इंग्लंडांत प्रसिद्ध झालें तर तीनचार महिन्यांत आठ आवृत्त्या निघाल्या ! पुढें जगांतील सर्व भाषांत तें गेलें. ‘ जागतिक इतिहासाचें ओझरतें दर्शन ’ ( ग्लिंप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ) हें असेंच सुंदर पुस्तक. आणि ‘ भारताचा शोध ’ ( डिस्कव्हरी ऑफ इंडिया ) तर जगभर गाजलें. जगभर त्यांचे ग्रन्थ गेले आहेत.

असे आपले पंडितजी आहेत. भारताचे ते भूषण आहेत. या देशांत सुबत्ता यावी, ज्ञान यावें, विज्ञान यावें, सर्वांचा संसार सुंदर व्हावा, सर्वांना थोडी विश्रांति, संस्कृतिसंवर्धनांत सारी जनता भाग घेत आहे, जातपात, प्रांत, धर्म या भेदांच्या पलीकडे जाऊन सारे सहानुभूतीनें प्रेमानें नांदत आहेत, रोगराई नाहीं, नवींनवीं क्षितिजें डोळ्यांसमोर आहेत, अविरत कर्म चाललें आहे, कोणावर आक्रमण नाहीं, कोणाचें होऊं देणार नाहीं, नांदा आणि नांदवा अशा दृष्टीचा, ध्येयवादी असा हा पुरुष आहे.

« PreviousChapter List