Bookstruck

भारतीय संस्कृती 34

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. एकदा इंद्र, वायू, अग्नी वगैरे देवांत फार वाद माजला. प्रत्येकजण म्हणे मी श्रेष्ठ. इंद्र म्हणाला, “मी पाऊस पाडतो. पाऊस न पडेल तर पृथ्वी सुकेल. जीवन अशक्य होईल.” वायू म्हणाला, “एक वेळ पाणी नसले तरी चालेल; परंतु हवा तर आधी हवी. मी सर्वांत श्रेष्ठ आहे.” अग्नी म्हणाला, “ऊब आधी हवी. उष्णता नाहीशी होताच मनुष्य थंडगार होतो. पाय गार पडत चालले असे लोक म्हणतात! अग्नीशिवाय, उष्णतेशिवाय सारे मिथ्या आहे.”

असे वाद चालले असताना तेथे एकदम एक तेजस्वी देवता आली. ही देवता कोण, कोठली वगैरेचे देवांना गूढ पडले. अग्नी म्हणाला, “मी त्या देवतेजवळ जाऊन तिची माहिती विचारून येतो.” अग्नी त्या देवतेजवळ गेला व म्हणाला, “आपण कोण?”

त्या देवतेने उलट प्रश्न केला, “आपण कोण?”

अग्नी चिडून म्हणाला, “माझे नाव माहीत नाही? मी अग्नी!”

देवता म्हणाली, “आपण काय करीत असता?”

अग्नी संतापाने म्हणाला, “अहो, सारे ब्रह्मांड एका क्षणात मी जाळून टाकीन! माझा पराक्रम हा तुम्हांला माहीत नाही?”

ती देवता म्हणाली, “असेल तुमचा तसा पराक्रम. परंतु माझ्या ऐकिवात नाही. ही येथे एक काडी आहे, ती जाळून दाखवा बरे.”

अग्नीने आपल्या सा-या ज्वाळा प्रज्वलित केल्या, परंतु ती काडी त्याच्याने जाळवेना. अग्नी खट्टू झाला. खाली मान घालून तो निघून गेला!

नंतर वारा आला.

“आपण कोण?” वायूदेवाने प्रश्न केला.

“आपण कोण?” देवतेने उलट विचारले.

“अहो, मी वारा.” वायू अहंकाराने म्हणाला.

“म्हणजे काय करता आपण?” देवतेने प्रश्न केला.

“अहो, मी पर्वताचे चेंडू करतो! वृक्ष उपटतो! पाण्याला नाचवतो. प्रचंड लाटा निर्माण करून गलबते बुडवितो! माझा पराक्रम तुम्हाला माहीत नाही?” वायूने रागारागाने विचारले.

« PreviousChapter ListNext »