Bookstruck

भारतीय संस्कृती 45

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महात्माजींचा क्षण न् क्षण सेवेत जात असे. गांधी-आयर्विन कराराच्या वेळेला दिल्लीला महात्माजींना कधीकधी अर्धा तासच झोप मिळायची. रात्री दोन वाजता बोलणे संपवून येत आणि राहिलेले सूत कातण्यासाठी त्या वेळेस चरखा घेऊन बसत ! ती त्यांची मूर्ती डोळ्यांसमोर आणा म्हणजे हृदय सद्गदित झाल्याशिवाय राहणार नाही.

भक्तिमय कर्मात असा आनंद आहे. त्या कर्माचे ओझे नाही. एखादा मोठा लाकडाचा ओंडका असावा. तो किती जड असतो. कोणाच्या डोक्यात घातला तर कपाळमोक्षच व्हावयाचा. परंतु त्या लाकडाच्या ओंडक्याला काडी लावा, त्या ओंडक्याची चिमूटभर निरुपद्रवी राख होईल ! मऊमऊ राख खुशाल अंगाला फासावी ! खुपणार नाही, रुतणार नाही. कर्माचे तसेच आहे. जे कर्म भाररूप वाटत असते, तेच भक्तिभावाने करू लागले म्हणजे सहज वाटते. खादी घरोघर जाऊन विकणे किती कठीण ! परंतु त्या कर्मात भक्ती ओता, म्हणजे ते खादीचे गाठोडे वाटेल. मग ते गाठोडे आपण खाली ठेवणार नाही. पुंडलिकाने प्रत्यक्ष परमेश्वर समोरस उभा राहिला तरी आईबापांचे पाय सोडले नाहीत. पुंडलिकाला माहीत होते, की या सेवाकर्माने देव दारात आला आहे. सेवाकर्म सोडून मी देवाकडे जाईन, तर देव पळेल. परंतु हे सेवाकर्म जोपर्यंत मी करीत आहे, तोपर्यंत युगे अठ्ठावीस हा पांडुरंग माझ्यासमोर उभा राहील व कृपादृष्टीची वृष्टी करील ! तुकारामांनी मोठ्या प्रेमाने लिहिले आहेः

“कां रे पुंड्या मातलासी
उभे केले विठोबासी।।”


पुंडलिक, माजलास होय तू ? –माझ्या विठोबाला सारखे उभे करून ठेविले आहेस ते !

परंतु तुकारामांनी तेच केले. देव समोर आला तरी माझे भजन थांबणार नाही असे ते म्हणतात. सेवेचे कर्म म्हणजेच सारे काही.

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी
विठ्ठल तांडी उच्चारा ।
विठ्ठल अवघ्या भांडवला
विठ्ठल बोला विठ्ठल ।।
विठ्ठल नाद विठ्ठल भेद
विठ्ठल छंद विठ्ठल।
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा
तुकयामुखा विठ्ठल ।।

या अभंगात जीवनाचे सारे तत्त्वज्ञान आले आहे. आपले कर्म, आपल्या कर्माची साधने, म्हणजे सारे ईश्वराचेच रूप. माझा चरखा म्हणजे माझा देव, माझे जाते म्हणजे माझा देव, माझी चूल म्हणजे माझा देव, माझा कारखाना म्हणजे देव, माझी खादी म्हणजे देव, माझी व्यायामशाळा म्हणजे देव, तेथील उपकरणे म्हणजे देव, प्रयोगशाळा म्हणजे देव, तेथील गॅस, तेथील अ‍ॅसिडे म्हणजे देव, सर्वत्र देवाचेच रूप !

« PreviousChapter ListNext »