Bookstruck

भारतीय संस्कृती 64

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


आपल्या संस्कृतीत अदृष्ट फळाची एक गोड कल्पना आहे. उथळ बुद्धीचे

“सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च”

या स्थिरचर सृष्टीचा तो प्राणदाता आहे. सूर्याला ह्या महान फळाची वार्ताही नाही. परंतु हे अदृष्ट फळ त्याला मिळतच आहे.

बाहेर सुंदर सुगंधी फूल फुलते. कितीतरी मानवांच्या जीवनात त्या फुलाच्या दर्शनाने आनंद उत्पन्न होत असतो. परंतु फुलाला त्याची कोठे कल्पना आहे ? वा-याबरोबर त्या फुलाचा परिमळ आसमंतात पसरतो व लोकांना सुख होते. आजा-याला प्रसन्न वाटते. मधमाशा, फुलपाखरे, भुंगे फुलाशी येतात, त्याला लुटतात, त्याच्याजवळ गुजगोष्टी करतात. फुलाला त्याची स्मृती नाही. त्याने आपले जीवन फुलवून ठेविले आहे. परंतु हजारो जीवांना आनंद दिल्याचे त्याला माहीत नसलेले ते अदृष्ट फळ त्याला मिळतच असते.

लहान मूल हसते, खेळते. जगू का मरू अशा स्थितीत असणा-या टेनिसनला फुले व मुले पाहून आशा मिळते. त्या मुलाला काय माहीत की हे हास्य निराश व निरानंद जीवनात सुधासिंधू ओतीत आहे ! आपल्या आईबापांना, भावाबहिणींना, शेजा-यापाजा-यांना आपल्यामुळे सुखसमाधान मिळत आहे हे मुलाला ठाऊक नसते. परंतु ते अदृष्ट फळ त्याला मिळत असते.

आपण खादी विकत घेतली. त्यामुळे कोणत्या खेड्यात, कोणत्या उपास काढणा-या कुटुंबाला दोन घास मिळाले, ते आपणांस माहीत नसते. परंतु आपणांस माहीत नसले, तरी तिकडे दोन जीब सुखी झाले ही गोष्ट काही खोटी नाही. चिंचेचा पाला शिजवून खाणारे लोक भाकर खाऊ लागले हे खरे आहे. मला दिसो वा न दिसो, ते अदृष्ट फळ मला मिळालेच आहे.

मनुष्याने सेवा करीत राहावे. सत्कर्म करीत राहावे. त्यामुळे मनाचे समाधान हे दृष्ट फळ तर त्याला पदोपदी आहेच ; परंतु समाजाला आनंद देण्याचे अदृष्ट फळही त्याला मिळत असते. या जगात जर काहीच फुकट जात नाही, तर सत्कर्म तरी फुकट कसे जाणार ? घराजवळ घाण केली तर डास होतात. घराजवळ स्वच्छता ठेवली तर आरोग्य व आनंद नांदेल. वाईट तो चांगले-दोघांना फळे येतच असतात. काटे पेराल तर काटे खाल. गुलाब लावाल तर गुलाब मिळतील. प्रत्येक गोष्टीचा परिणाम स्वतःवर व सभोवतालच्या सृष्टीवर होत असतो. आकाशात तारा चमकतो व माझ्या जीवनात पावित्र्य येते. ध्रुवतारा दिसतो व माझी नौका सुरक्षित जाते. मनात आलेल्या भावनांचा व विचारांचाही जर परिणाम होतो, तर मग केलेल्या कृतीचा परिणाम कसा होणार नाही ? हा परिणाम अदृष्ट असेल, परंतु ते होत असतो यात शंका नाही.

केवळ कर्मातच रमून जाणे हे एकदम साधणार नाही. मनुष्य प्रथम लोभाने कर्मास प्रवृत्त होतो, आई मुलाला म्हणते, “श्री ग काढ, म्हणजे खारीक देईन.” त्या खारेकच्या आशेने तो मुलगा पाटी घेतो. वडी मिळेल म्हणून तो शाळेत जातो. परंतु पुढे विद्येचा आनंद कळतो. विद्येसाठी म्हणून तो विद्या शिकतो. त्या वेळेस इतर फळे त्याला मिळत नाहीत असे नाही. लहानपणी खारीकच मिळे, परंतु आता फळाची सोडून विद्येची अशी उपासना करू लागताच त्याला मानसन्मान, कीर्ती, पदव्या, सारे मिळते. त्याला नियंत्रण येतात, त्याची स्वागते होतात. अनंत फळे त्याच्यापुढे हात जोडून उभी राहतात. ऋद्धिसिद्धी त्याच्याभोवती तिष्ठत राहतात. परंतु त्या मानसन्मानांचा त्या विद्यानंद पुरुषास आनंद वाटत नाही.

« PreviousChapter ListNext »