Bookstruck

भारतीय संस्कृती 67

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गुरु-शिष्य

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दंभाचा पसारा सर्वत्र वाढल्यामुळे, दिखाऊपणाचे स्तोम जिकडे तिकडे माजल्यामुळे थोर गुरुभक्तीचे महान तत्त्व आज धुळीत पडले आहे.

गुरू म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, केवळ आचार्य नव्हे. शिक्षक किंवा आचार्य त्या त्या विशिष्ट ज्ञानाशी आपला थोडाफार परिचय करून देत असतात. त्यांचा हात धरून आपण ज्ञानाच्या अंगणात येतो. परंतु गुरु आपणांस ज्ञानाच्या गाभा-यात घेऊन जातो. त्या त्या ध्येयभूत ज्ञानाशी गुरू आपणांस एकरूप करून टाकतो. ज्ञानाशी तन्मय झालेला गुरु शिष्याचीही समाधी लावतो. शाळेत विद्यार्थी प्रश्न विचारतात, परंतु गुरुजवळ फारशी प्रश्नोत्तरे नसतात. तेथे न बोलता शंका मिटतात, न सांगता उत्तरे मिळतात. येथे पाहावयाचे, ऐकावयाचे. न बोलता गुरू शिकवितो. न विचारता शिष्य शिकतो. गुरु म्हणजे उचंबळणारा ज्ञानसागर ! सच्छिष्याचा मुखचंद्र पाहून गुरू हेलावत असतो. गीतेमध्ये ज्ञानार्जनाचे प्रकार सांगितले आहेतः

“तद्धिद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया”

ते ज्ञान प्रणामाने, पुनःपुन्हा विचारण्याने, सेवेन प्राप्त करून घे. शिक्षकाजवळ परिश्रमाने आपण ज्ञान मिळवितो. परंतु गुरुजवळ प्रणाम व सेवा हेच ज्ञानाचे दोन मार्ग असतात. नम्रता हा ज्ञानाचा खरा आरंभ आहे. गुरुजवळ शिष्य रिकामे मन घेऊन जातो. विहिरीत अपरंपार पाणी आहे ; परंतु भाडे जर वाकणार नाही, तर त्या भांड्यात त्या अनंत पाण्यातील एक थेंबही शिरणार नाही. तसेच ज्ञानाचे जे सागर असतात, त्यांच्याजवळ जोपर्यंत आपण वाकणार नाही, निमूटपणे त्यांच्या चरणांजवळ बसणार नाही, तोपर्यंत ज्ञान आपणांस मिळणार नाही. भरण्यासाठी वाकावयाचे असते. वाढविण्यासाठी नमावयाचे असते.

एखादा संगीत शिकू पाहणारा मुलगा एखादा संगीत-शाळेत जातो. तेथे काही वर्षे तो शिकतो. परंतु संगीताचे खरे ज्ञान त्याला होत नाही. संगीताशी त्याचा परिचय होतो. संगीताचा आत्मा त्याला केव्हा दिसणार ? केव्हा समजणार ? एखादा महान गायकाच्या संगीतात जेव्हा साधक होऊन तो वर्षानुवर्षे राहील, त्या गुरुची भक्तिप्रेमाने सेवा करील, जेव्हा जेव्हा गुरू राग आळवू लागेल तेव्हा तेव्हा नम्रपमे सर्व इंद्रियांचे कान करून तो राग तो ऐकेल, तेव्हाच खरी विद्या त्याला प्राप्त होईल. त्याच्या ओबडधोबड विद्येला तेव्हाच सुसंस्कृतता येईल, कळा चढेल.

केवळ विनम्र होऊन येणारा हा जो ज्ञानोपासक शिष्य, त्याची जातकुळी गुरू विचारीत नाही. तळमळ ही एकच वस्तू गुरू ओळखतो. शत्रूकडचा कचही प्रेमाने पायाशी आला, तर शुक्राचार्य त्याला संजीवनी देतील. रिकामा घडा घेऊन गुरूजवळ कोणीही या व वाका, तुमचा घडा भरून जाईल.

गुरू आपणांस संपूर्ण ज्ञानाची भेट करवितो. त्या त्या ज्ञानप्रांतातील या क्षणापर्यंतच्या सकल ज्ञानाशी तो आपली सांगड घालून देतो. सर्व भूतकाळ तो आपणांस दाखवितो. वर्तमानकाळाची ओळख देतो. भविष्यकाळाची ओळख देतो. भविष्यकाळाची दिशा सांगतो. गुरू म्हणजे आतापर्यंतचे संपूर्ण ज्ञान.

« PreviousChapter ListNext »