Bookstruck

भारतीय संस्कृती 70

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“अध्यात्मविद्या विद्यामान्” असे गीता सांगते. जीवन सुंदर करणे, स्वतःचे जीवन निर्दोष, निष्काम, निरुपाधी करणे हे सर्वांत थोर विद्या. ही विद्या शिकविणारा तो सद्गुरू. नेपोलियन युद्धशास्त्र शिकवणा-यांचा गुरू आहे. परंतु स्वतःच्या जीवनातील कामक्रोधांच्या वेगाशी लढावयास शिकविणारा तो सद्गुरू होय.

उत्कृष्ट वाद्य वाजविणारा मुलांबाळांवर संतापून त्यांना रडायला लावील ! डामरातून सुंदर रंग काढणारा शास्त्रज्ञ जीवनाला डामर फासू शकेल ! प्रकाशाची उपासना करणारे चंद्रशेखर रामन प्रत्यक्ष संसारात प्रांतीय भेदभावांचा अंधार उत्पन्न करतील ! सुंदर विचार देणारा पंडित बेकन खुशाल लाचलुचपत घेईल !

जगात शास्त्रांचा कितीही विकास झाला, तरी जोपर्यंत जीवनकला माणसास साधत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ होय. समाजात परस्परांशी कसे वागावयाचे ते आधी शिका, असे महर्षी टॉल्स्टॉय म्हणत असत. जीवन मधुर कसे करावे हे संत सांगतात. रेडिओ ऐकून संसारात संगीत येणार नाही. तुमच्या या बाह्य टाकंटिक्यांनी रडका संसार मधुर होणार नाही. संगीत आत अंतरंगात सुरु झाले पाहिजे. हे जीवनातील सागरसंगीत सद्गुरु शिकवितो. तो हृदयात प्रकाश पाडतो. बुद्धीला सम करतो. प्रेमाचे डोळे देतो. तो कामक्रोधादी सर्पांचे दात पाडतो. तो द्वेषमत्सरादी व्याघ्रांना कोकरे बनवितो. सद्गुरू हा असा मोठा किमयागार असतो.

म्हणून भारतात सत्संग किंवा सज्जनांची सेवा यांना फार महत्त्व दिले आहे.

सज्जनसंगतिरेका। भवति भवार्णव-तारण-नौका।।

रवीद्रनाथ सृष्टीकडे कसे पाहतात, महात्माजी शांतपणे अविरत कसे कार्यमग्न असतात, हे त्यांच्याजवळ बसल्यानेच कळेल.

थोरांच्या संगतीत क्षणभर राहिले तरी संस्कार होतो. भगवान बुद्धांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. एकदा भगवान बुद्ध एका नगराबाहेरच्या विशाल उद्यानात उतरले होते. त्यांच्या दर्शनासाठी लहान-मोठे, स्त्री-पुरुष, राव-रंक सारे जात होते. एके दिवशी प्रातःकाळी राजा एकटाच पायी दर्शनास जात होता. तिकडून दुसरा एक श्रीमंत व्यापारीही जात होता.

त्यांना वाटेत एक माळी भेटला. माळ्याच्या हातात एक रमणीय सुंगधी कमळ होते. शरद ऋतू संपून शिशिर ऋतू सुरु झालेला होता. कमळे दुर्मिळ झाली होती. ते दुर्मिळ कमळ विकत घेऊन आपण बुद्धदेवाच्या चरणी वाहावे असे राजास व त्या सावकारास दोघांसाठी वाटले.

सावकार माळ्याला म्हणाला, “माळीदादा, फुलाची काय किंमत ?”

माळी म्हणाला, “चार पैसे.”

राजा म्हणाला, “मी दोन आणे देतो. मला ते दे.”

सावकार म्हणाला, “माळीदादा ! मी चार आणे देतो, मला दे.”

राजा म्हणाला, “मी आठ आणे देतो.”

सावकार म्हणाला, “मी रुपया देतो.”

« PreviousChapter ListNext »